Chhatrapati Sambhaji Nagar crime News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar ) एका वयोवृध्द कीर्तनकारास धमकी देणाऱ्या दोघांविरोधात शहरातील वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला 30 हजार रुपये द्या अन्यथा तुमचे फोटो इतरांना दाखवून समाजात तुमची बदनामी करीन, अशी धमकी कीर्तनकारास देण्यात आली होती. दरम्यान सततच्या या धमकीला कंटाळून कीर्तनकाराने पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील मांगेगाव येथील कीर्तनकार अंबादास गावंडे हे सध्या वाळूजला आपल्या कुटंबासह राहतात. तर मृदंगवादक ज्ञानेश्वर सुलाने (रा. बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्या मध्यस्थीने कीर्तनकार गावंडे अनेक ठिकाणी कीर्तनातून प्रबोधन करण्याचे काम करतात. विशेष म्हणजे सुलानेबरोबर चांगल्या प्रकारचे ओळखीचे सबंध झाल्याने सदर कीर्तनकारांनी त्याला आपल्या घरीही अनेकवेळा आणलेले होते. अशातच 13 मे रोजी सुलाने यांनी मला वृंदावनला जायचे असल्याने अंबादास महाराज यांना 30 हजारांची मागणी केली. त्यावर कीर्तनकाराने नकार देताच त्याने माझ्याजवळ असलेले तुमचे फोटो मी इतरांना दाखवून तुमची समाजात बदनामी करील अशी धमकी दिली.
दरम्यान त्यानंतर मांगेगाव येथेही जाऊन अशोक गावंडे यांच्या संगतीने पुन्हा 15 मे रोजी वरील प्रकारची धमकी दिल्याचे गावंडे यांनी सदर कीर्तनकाराला कळविले. गेल्या 15 मे पासून पैसे दे अन्यथा बदनामी करील अशी सुलाने सतत धमकी देत होता. तसेच त्यांचे कोणते फोटो आहेत हे किर्तनकारालाही माहिती नाही. त्यामुळे त्रास असहय्य झाल्याने अखेर कीर्तनकार अंबादास मारुती गावंडे यांनी ज्ञानेश्वर सुलाने (रा.सासेगाव, ता. कन्नड ह. मु. बजाजनगर) अशोक बारकु गावंडे ( रा. मांगेगाव ) या दोघाच्या विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी वरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra crime News : 'तो' फोटो कोणता?
मला 30 हजार रुपये द्या अन्यथा तुमचे फोटो इतरांना दाखवून समाजात तुमची बदनामी करीन, अशी धमकी कीर्तनकारास देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान यामुळे तो फोटो नेमका कोणाचा आणि त्यात काय आहे अशी देखील चर्चा यामुळे होऊ लागली आहे. तर या फोटोबाबत आपल्याला देखील काहीही माहित नसल्याचं कीर्तनकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलीस तपासातच या सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: