Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, रोहित्र (Electric DP) अंगावर पडल्याने ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा दबून मृत्यू झाला. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा विद्युत पुरवठा बंद असल्याने रोहित्रावरील फ्यूज टाकत असताना ही घटना मंगळवारी (6 मे) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास गाढेजळगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली आहे. तर शेख हयाज शेख नसरुद्दीन (वय 49 वर्षे, रा. गाढेजळगाव) असे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर या प्रकरणी करमाड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 


अधिक माहिती अशी की, गाढेजळगाव गावाच्या पाणीपुरवठा योजनेस विद्युत पुरवठा करणारे रोहित्र गावालगत आहे. हा डीपी काही दिवसांपूर्वी बिघडला होता. त्यामुळे वीज वितरण कंपनीमार्फत तात्पुरत्या स्वरुपात दुसरी डीपी बसवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यासाठी फ्यूज नसल्याने शेख हयाज हे डीपीवर गेले होते. याचवेळी फ्यूज टाकत असताना थेट डीपीच त्यांच्या अंगावर कोसळला. डीपी खाली ते दबले गेले. घटनास्थळ हे गावालगत आणि मुख्य रस्त्यावर असल्याने ग्रामस्थ त्वरीत तिथे धावले. तात्काळ डीपी बाजूला सारुन शेख हयाज यांना वरुडी इथल्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. 


या प्रकरणी करमाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. करमाड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे करत आहेत. तर वीज वितरण कंपनीच्या संबंधितांनी आरोप फेटाळले. डीपीवर काही काम करावयाचे होते तर तशी कुठलेही परवानगी घेण्यात आली नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे. 


पूर्ण नटबोल्ट बसवले नसल्याचे आरोप


गावाच्या पाणीपुरवठा योजनेस विद्युत पुरवठा करणारे रोहित्र खराब झाल्याने, तात्पुरत्या स्वरुपात नवीन डीपी बसवण्यात आला होता. तर डीपी तात्पुरत्या स्वरुपात बसवण्यात आल्याने वीज वितरण कंपनीने पूर्ण नटबोल्ट न बसवता वायररोप लावून जागेवर लावली होती, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. सध्या वादळी वारे होत असल्याने पूर्ण ताकदीने न बसवलेल्या डीपीने जागा सोडली असावी आणि ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : एकतर्फी प्रेमातून भाच्याचा मामाच्या मुलीशी लग्नाचा हट्ट; नकार देताच विकृतीवर उतरला