Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) बुधवारी मध्यरात्री झालेल्या वादावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरूच आहे. मात्र या वादाची सुरवात कशी झाली आणि सुरुवातीला झालेला किरकोळ वाद एवढा कसा वाढला याबाबत छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाचे आयुक्त निखील गुप्ता (CP Nikhil Gupta) यांनी सविस्तर माहिती 'एबीपी माझा'ला दिली आहे. बुधवारी झालेला राडा अचानक नव्हे तर तीन वेगवेगळ्या टप्प्यात झाला असल्याचं देखील पोलीस आयुक्त गुप्ता यांनी म्हटले आहे.
दरम्यान याबाबत बोलताना पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले की, बुधवारी रात्री अकरा-साडेअकरा वाजेच्या सुमरास काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला. दोन्ही बाजूने चार-चार मुलं होती. यता एकाबाजूची मुलं निघून गेली, पण गर्दी जमा झाली होती. परंतु पोलिसांनी तत्काळ जमा झालेला जमाव पांगून लावला. हा पहिला टप्पा होता. मात्र त्यानंतर पुन्हा 50-60 लोकं आली, पण ते आक्रमक नव्हते. पोलिसांनी त्यांना देखील पांगवले. पण त्यानंतर एक-दीड तासाने मोठा जमाव झाला. हा सर्व प्रकार तीन-चार तास सुरु होता. ज्यात एक ते दीड तास दगडफेक सुरु होती. म्हणजेच हा सर्व राडा वेगवेगळ्या तीन टप्प्यात झाला.
पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली...
सुरुवातीला जेव्हा किरकोळ वाद झाला तेव्हापासून तर मोठ्या जमावाने घातलेल्या धुडगूस संपेपर्यंत पोलीस घटनास्थळी होते. तसेच पोलिसांवर हल्ला होत असताना देखील पोलिसांनी शेवटपर्यंत घटनास्थळ सोडले नाही. पोलिसांच्या याच भूमिकेमुळे हल्लेखोरांना शेवटी पळ काढावा लागला. पोलिसांमुळे रात्रीतून सर्व परिस्थिती नियंत्रणात आली. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी कलेले योग्य नियोजन आणि घेतलेल्या भूमिकेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
'त्या' आरोपांवर पोलीस आयुक्तांचे उत्तर...
पोलिसांचा फोर्स आतमध्ये वेळेत घुसला नाही, त्यांनी उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. यावर उत्तर देताना पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले की, सुरुवातीपासूनच आमचे काही पोलीस कर्मचारी आणि चार अधिकारी आतमध्ये होते. मात्र अचानक जमाव वाढला आणि त्यांनी तोडफोड सुरु केली. मी स्वतः आमच्या अधिकाऱ्यांसह मोठा बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहचलो होतो. पण जमाव मोठा आणि आतमध्ये नक्की काय सुरु आहे याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अशावेळी थेट आतमध्ये घुसणे शक्य नव्हते. अशामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आतमधील परिस्थितीची माहिती घेऊन आम्ही योग्य नियोजन करून आतमध्ये घुसले. त्यांनंतर अवघी अर्ध्या तासात आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते, असेही पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या घटनेस कोण जबाबदार? अंबादास दानवेंनी थेट नावच घेतलं