Chandrakant Khaire On Abdul Sattar: कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असून, गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) करत जीवन संपल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील तीन शेतकरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे यावरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली आहे. 


याबाबत बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, एकीकडे तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त असतांना शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडल्याने शेतकऱ्यांचे गव्हु, मका, हरभरा, भाजीपाला, फळबागा आदीचे नुकसान झाले. असे असताना धक्कादायक बाब म्हणजे, राज्याच्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका आठवड्यात एकूण 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. ज्यात सत्तार यांच्या मतदारसंघातील 3 जणांनी जीवन संपविले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी घेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.


मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात देखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी करत, नुकसानीची माहिती जाणून घेतली. खैरे यांनी गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील गंगापूर, वैजापुर, कन्नड आदी तालुक्यातील गावात भेटी देऊन पाहणी केली. तसेच या पिकांची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी सोमवारी 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याची माहिती खैरे यांच्याकडून देण्यात आली आहे. 


आठवड्याभरात सहा शेतकऱ्यांची आत्महत्या! 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवडाभरात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सिल्लोडच्या अंधारी गावात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46 वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांची नावं आहेत. तर गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अशोक शिरसाट असे या मयत शेतकऱ्याचं नाव आहे.  तसेच कर्जबाजारीपणास कंटाळून खुलताबाद तालुक्यातील दरेगाव आणि वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी येथील प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. शंकर अंबादास गायकवाड (वय 35 वर्षे)  आणि राजूसिंग लालसिंग बेडवाळ (वय 40 वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे होती. तर सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील सुरज उदयसिंग सेवगन ( वय 25 वर्षे) या तरुण शेतकऱ्याने देखील आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Abdul Sattar: चक्क कृषीमंत्र्यांचाच तालुका नुकसानीतून वगळला; कृषी विभागाकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये शून्य टक्के नुकसानीचा अहवाल