Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, तहसीलदारांसह महसूल पथकावर हल्ला करण्यात आला आहे. गौण खनिजचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यासाठी गेल्यावर महसूल पथकावर हा हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी शहरातील देवळाई-कचनेर रोडवरील सहस्त्रमुळी भागात ही घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी हल्ला करणाऱ्या माफियांविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात विविध कलमांवन्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कचनेर रोडवरील सहस्त्रमुळी शिवारातून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक केली जात असल्याची माहिती ग्रामीण विभागाचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांना मिळाली होती. त्यामुळे मुंडलोड यांनी या भागातील तलाठ्यांना कारवाईसाठी बोलावून घेतले. मुंडलोड स्वतः च्या खाजगी वाहनाने सकाळी पावणेदहाच्या सुमारास पथकासह सहस्त्रमुळी शिवारात दाखल झाले. या शिवारातून मुरूमाने भरलेला एक हायवा पकडण्यात पथकाला यश आले. पथकाने चालकाकडे परवानगीची विचारणा केली असता, अवैधरित्या मुरूम वाहतूक सुरु असल्याचे समोर आले. त्यामुळे या पथकाने चालकाला हायवा तहसील कार्यालयाच्या दिशेने नेण्यास सांगितले. यावेळी पथकातील ज्ञानेश्वर सोनवणे आणि रवी लोखंडे हे दोन तलाठी हायवामध्ये बसले. तहसीलदार मुंडलोड जेसीबीवर कारवाईसाठी पुढे गेले. मात्र, हायवा भिंदोन तांड्यापर्यंत आल्यानंतर चालकाने दोन्ही तलाठ्यांना धमकावत धक्काबुक्की सुरु केली. तसेच, रस्त्यात हायवा थांबवून त्यात आणखी एक जण बसला आणि त्यांने देखील तलाठ्यांना मारहाण करून खाली ढकलून देण्याची धमकी दिली.


मारहाण करून टोळके पसार 


महसूल पथकाने हायवा ताब्यात घेतल्याचे कळताच जेबीसी चालक जेसीबीसह घटनास्थळावरून पळ काढण्याच्या तयारीत होता. दरम्यान, तिथे पोहचलेल्या तहसीलदार मुंडलोड यांनी सोबतच्या तलाठ्यांना कारवाईचे आदेश दिले. मात्र, तेथे जमलेल्या लोकांनी तहसीलदार मुंडलोड, तलाठी राजेंद्र भांड, सतीश घुगे, मंडळ अधिकारी विश्वनाथ गांगुर्डे यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत हल्ला चढवला. यामध्ये काही तलाठी जखमी झाले. मारहाण करून हे टोळके पसार झाले. मात्र त्यानंतरही पथकातील काही तलाठ्यांनी हिंमत दाखवित टोळक्यातील सलीम अबजल शेख याला पकडून ठेवले. त्याची दुचाकी (एमएच-20- एफएफ-1491) जप्त केली. त्यानंतर त्याला चिकलठाणा पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच, या प्रकरणी एकूण 10 लोकांच्या विरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन...


मागील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे शासकीय प्रकल्पासाठी संपादन करण्यात आलेल्या जमिनीवर या माफियांचा डोळा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच शेंद्रा, बिडकीन या भागातील डीएमआयसीसाठी संपादन करण्यात आलेल्या जमिनीवर बिनधास्तपणे ठिकठिकाणी अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करण्यात येत असल्याचे चित्र आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठा आरक्षणावरून तरुण आक्रमक, भागवत कराडांचे भाषण थांबवले; कांद्यावरून शेतकऱ्यांनीही विचारला प्रश्न