Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून, माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) उमेदवारी दिल्यास वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) रिंगणात उतरणार असल्याचे देखील जाधव म्हणाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील हर्षवर्धन जाधवांनी रिंगणात उतरत तब्बल 2 लाख 83 हजार 798 मते मिळवले होते. त्यांच्या उमेदवारीमुळेच चंद्रकांत खैरेंचा (Chandrakant Khaire) पराभव झाला होता. 


छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांचे नाव घोषित झाले आहे. तर, विनोद पाटील यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त आहे. तसेच केंद्रीय मंत्री भागवत कराड देखील उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. असे असतानाच लोकसभेच्या निवडणुकीत आता पुन्हा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे रिंगणात उतरणार आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. तसेच, बाळासाहेब आंबेडकर यांनी जर संधी दिली, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रिंगणात उतरणार असल्याची इच्छा देखील जाधव यांनी व्यक्त केली आहे. 


मागील आरक्षणासाठी दिला होता राजीनामा...


गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी पहिला आमदारकीचा राजीनामा मराठा आरक्षणासाठी दिला होता. पुढे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांना 2  लाख 83 हजार 798 मते मिळाले. त्यामुळे यंदाही माझे मते कमी झाले नसून, आणखी वाढणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. 


खैरे, जलील यांची ताकद कमी झाली...


मागील लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांच्या एमआयएम पक्षासोबत युती केली होती. पण, यंदा त्यांची युती नसल्याने जलील यांचे मतदान घटणार आहे. तसेच, खैरे यांच्या शिवसेनेत बंडखोरी झाली असून, भाजप देखील त्यांच्यासोबत नसणार असल्याने खैरे यांचे मत देखील कमी होणार आहे. पण माझ्या मतात कोणतेही घट होणार नसून, किंबहुना मतदान वाढले असेल असेही जाधव म्हणाले आहेत. त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


आधी म्हणाले प्रचार करणार नाही?, आता पेढे घेऊन दानवे थेट खैरेंच्या घरी पोहचले