Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये (Mahayuti) अजूनही अनेक जागांचा निर्णय झालेला नाही. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency) जागा शिंदेसेनला (Shiv Sena) सुटणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. याच अनुषंगाने आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे गटाच्या (Shinde Group) नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या कार्यालयात ही बैठक झाली असून, मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) देखील या बैठकीला उपस्थित होते. तर, महायुतीत संभाजीनगरची जागा शिवसेनेकडेच राहणार असून, इच्छुकांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 


महायुतीत अनेक जागांचा तिढा अजूनही कायम आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. या जागेवर भाजप आणि शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. पण शिंदे गट ही जागा सोडण्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाच्या पदरात पडण्याची शक्यता असून, उद्या याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी संजय शिरसाट यांच्या संभाजीनगरच्या कार्यालयात महत्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत पालकमंत्री संदिपान भुमरे, संजय शिरसाठ आणि सर्व संभाजीनगरचे जिल्हाप्रमुखांची उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाली आहे. संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार कोण याबाबत अद्याप निर्णय झाला नसून, त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


शिंदे गटाकडून 'या' नावांची चर्चा...


शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काही नावाची चर्चा सुरु आहे. ज्यात संदिपान भुमरे आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे नावं आघाडीवर आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यावर देखील चर्चा होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे संदिपान भुमरे यांचे नावं जवळपास निश्चित असल्याचे देखील बोलले जात आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील याबाबत सकारात्मक असल्याची चर्चा आहे. 


पूर्वतयारी म्हणून आजची बैठक : संदिपान भुमरे 


या बैठकीनंतर प्रतिक्रिया देतांना संदिपान भुमरे म्हणाले की, “महायुतीत संभाजीनगरची जागा शिवसेनेची असून, आधीपासून आमची याबाबतीत मागणी आहे. वेळेवर जो कुणी उमेदवार आम्हाला दिला जाईल, त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. उमेदवार कोण असेल हे आत्ताचा सांगता येणार नाही, पण उमेदवार हा धनुष्यबाण असणार असल्याचे भुमरे म्हणाले आहेत. 


उमेदवाराच्या नावाची घोषणा एकनाथ शिंदे करणार : संजय शिरसाट 


तर, राजकरणात निवडणुकीत आज याचे उद्या त्याचे असे नावांची चर्चा होत असते. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपणच चांगला उमेदवार कसे आहोत हे पक्षश्रेष्ठींना सांगत असतो. पण, उमेदवारी कुणाला जाहीर करायची याच संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. जेव्हा ते अधिकृतरीत्या ज्याचं नाव घोषित करतील तेव्हा तो खऱ्या अर्थाने उमेदवार असेल. तसेच ही जागा शिवसेनेची असून, शिवसेना पक्षाकडूनच लढवली जाणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Sandipan Bhumre : संदिपान भुमरे संभाजीनगरमधून इच्छुक, पण स्वतःचा पैठण मतदारसंघ जालन्यात; शिंदेंच्या 'मामा'ची अशीही अडचण