छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यक्रमात लाभार्थींचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच आरोग्य किटचे खोके घेण्यासाठी गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस यांचे भाषण सोडून शेकडो लाभार्थी किट घेण्यासाठी पळाले आणि एकच गोंधळ उडाला. फडणवीस यांनी अवाहन करून देखील लाभार्थी थांबायला तयार नव्हते. कुणी पत्रे उचकवून, तर कोणी जाळ्या तोडून आतमध्ये घुसत होते. विशेष म्हणजे काहींनी तर थेट मारामारी देखील केली.
भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ देखील मिळणार होते. ज्यात, कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो मेडिकल किट, कामगार किट वाटप केले जाणार होते. मात्र, फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच मेडिकल किटचे बॉक्स घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. पाहता पाहता एकच झुंबड उडाली. महिला-पुरुष आणि लहान मुलं हातात येईल तेवढे बॉक्स घेऊन पळत होते. एवढेच काय तर काहींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेले पत्रे उचकवून पेट्या घेऊन पळ काढला.
लाभार्थ्यांची मारामारी...
फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच लाभार्थी कार्यक्रमास्थळी असलेल्या पेट्या घेऊन जाण्यासाठी धावपळ करू लागले. याचवेळी काही तरुणांकडून कामगारांसाठी दिल्या जाणाऱ्या पेट्यांची पळवा पळवी सुरू झाली. एकच पेटी दोघा-तिघांच्या हातात आल्यावर वाद झाला. त्यामुळे एकाने थेट हातातील पेटीने दुसऱ्याला मारहाण सुरू केली. हा सर्व गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
यापूर्वी देखील असाच गोंधळ....
विशेष म्हणजे प्रशांत भाऊ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात यापूर्वी देखील असाच काही गोंधळ पाहायला मिळाला होता. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार बंब यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देखील महिलांसाठी आरोग्य किट आणि कामगार पेट्यांचे वाटप करण्यात येणार होते. यावेळी देखील लोकांनी आरोग्य किट आणि पेट्यांची पळवापळवी केली होती. लोकांना आवरण्यासाठी बंब यांच्या कार्यकर्त्यांनी लाठीमार देखील केला होता. मात्र,लाठ्या-काठ्या खाऊन देखील लोकांनी काही मिनिटात सगळ्या पेट्या गायब केल्या होत्या. आता पुन्हा असाच गोंधळ आजच्या कार्यक्रमात देखील पाहायला मिळाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या संभाजीनगर दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध