Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामावरून काढल्याच्या रागातून उद्योजकाला 6 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भर दुपारी एका उद्योजकाला झालेल्या मारहाणीनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.  नागेश्वर मुळे असे मारहाण करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव आहे. 


खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा गावात लक्ष्मी मिल्क कंपनीमधील उद्योजकाने महिनाभरापूर्वी राहुल पवार नावाच्या व्यक्तीला कंपनीत मार्केटिंग साठी नेमले होते. यावेळी त्यांनी जालन्याच्या एका वितरकाला तुम्ही कंपनीचा माल खरेदी करा व त्याचे पैसे देऊ नका असा फोन केला. मुळेन यांना राहुल सोबत झालेल्या या वितरकाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मिळाल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकले होते. 


कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून संतप्त झालेल्या राहुलने उद्योजक नागेश्वर मुळे यांना धडा शिकवण्याचे ठरवले. यानुसार त्यांनी इतर साथीदारांना बोलावून उद्योजक मुळे यांना लाथा बुक्क्यांनी आणि दांड्याने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा:


हॉटेलच्या बिलावरुन वाद, टोळक्याकडून मालकावर तलवारीनं हल्ला, घटना CCTV मध्ये कैद