औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. औरंगाबादच्या केंब्रिज चौकातील टाकली फाटा येथे ही घटना घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या गुन्हे शाखेने या गाडीला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस पथकाच्या अंगावर थेट गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान यावेळी पोलिसांकडून बचावासाठी गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक संशयित वाहन येणार असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीणच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने केंब्रिज भागातील टाकली फाटा येथे सापळा लावला होता. मात्र पोलीस असल्याचं लक्षात येताच संशयित चार चाकी वाहन चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. थेट अंगावर गाडी येत असल्याने पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही वाहन चालक पोलिसांच्या थेट अंगावर गाडी घालत होता. शेवटी पोलिसांकडून वाहन रोखण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी औरंगाबाद ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.