Chhatrapati Sambhajinagar: राज्यभरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैल सजवणे, पूजा, मिरवणुका या पारंपरिक रितींनी गावागावांत पोळ्याचा आनंद अनुभवला गेला. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाडळी येथे साजरा होणारा पोळा यावर्षीही चर्चेत राहिला. कारण इथे दरवर्षी पोळ्यानिमित्त एक आगळीवेगळी परंपरा पाळली जाते.
पाडळी गावातील बुरा दिन बाबा दर्ग्याजवळ 100 किलो वजनाचा दगड ठेवलेला आहे. या दगडाला ‘शक्तीची कसोटी’ असे म्हटले जाते. परंपरेनुसार, पोळ्याच्या दिवशी 12 जण हा दगड केवळ बोटांच्या जोरावर उचलतात. प्रत्येक व्यक्ती फक्त एक बोट दगडाखाली लावतो आणि एकाच वेळी सर्वजण जोर देतात. आश्चर्य म्हणजे, नेमके 12 जण असतील तेव्हाच हा दगड जमिनीवरून उचलला जातो. बारापेक्षा एक जरी जास्त व्यक्ती झाली, तर दगड उचलता येत नाही, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये आहे.
ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू
गावकरी सांगतात की ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आणि ती दरवर्षी पोळ्याच्या दिवशीच पार पडते. ग्रामस्थांच्या मते, या विधीत सामूहिक शक्ती आणि श्रद्धेचे दर्शन घडते. यामागे नुसता शारीरिक जोर नाही, तर एकता आणि श्रद्धाही तितकीच महत्त्वाची असल्याचे गावकरी सांगतात. या वर्षीही गावकऱ्यांनी ही अनोखी परंपरा मोठ्या उत्साहात पार पाडली. दगड उचलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हजारो लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत गावकऱ्यांच्या सामूहिकतेचे कौतुक केले आहे.
या दगड उचलण्याच्या विधीला पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने लोक पाडळी गावात गर्दी करतात. यावेळीही पोळ्यानिमित्त गावात मोठी उत्सवमूर्ती वातावरण होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व बैलगाड्यांच्या शोभायात्रेत गाव रंगलं होतं. गावकऱ्यांनी सांगितले की ही परंपरा केवळ श्रद्धेची नव्हे तर एकतेची सुद्धा आहे. यामुळे गावातील तरुण पिढीला परंपरेचे महत्त्व समजते आणि ग्रामीण संस्कृती जिवंत राहते.