Chhatrapati Sambhajinagar News : नोकरी, व्यवसायातील व्यस्त आयुष्यात अनेकांना कुटुंबाला वेळ देता येत नाही. धावपळीच्या आयुष्यात मुलांना प्रेम देता येत नाही. मात्र तुमची हीच सवय धोकादायक ठरु शकते. कारण छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) असाच काही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीत (Job) व्यस्त असलेले आई-वडील आपल्याला वेळ देत नसल्याने 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने वाढदिवसाच्या दिवशी घर सोडलं. शहरातील चिकलठाणा परिसरात मंगळवारी (28 फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी मुलीचा शोध घेतला आणि हा सर्व प्रकार समोर आला.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षांच्या एका मुलीचे आई-वडील खाजगी शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान मंगळवारी या मुलीचा वाढदिवस होता. पण पेशाने शिक्षक असलेल्या आई-वडिलांना आपल्यासाठी वेळ नाही, ते कधी बाहेर फिरायला घेऊन जात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्याचा मुलीला कंटाळा आला होता. त्यामुळे आपल्यासोबत शाळेत शिक्षण घेणाऱ्या 12 वर्ष वयाच्या दोन मैत्रिणीसोबत आपणच कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, असा प्लॅन शिक्षकाच्या मुलीने बनवला.


अन् तिन्ही मुलींनी सोडलं घर!


बाहेर फिरायला जायचा तिन्ही मैत्रिणीचा प्लॅन झाला. त्यानुसार तिघींनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घर सोडले आणि चिकलठाणा परिसरातूनच ऑटोरिक्षात बसून छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक गाठले. दरम्यान या तिन्ही मैत्रणी आठ वाजता मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वेत बसल्या आणि मनमाडला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उतरल्या. पुढे तिघींनी रेल्वे स्थानकावरच रात्र काढली. एकीकडे मुली मनमाडला पोहोचल्या होत्या, तर दुसरीकडे पालक पोलिसात पोहोचले होते. पोलिसांनी सुद्धा घटनेची गंभीरता लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला आणि तात्काळ तपास सुरु केला.


पोलीस सीसीटीव्ही तपासत असतानाच दिसल्या मुली!


दरम्यान मनमाड रेल्वे स्थानकावर रात्र काढल्यानंतर तिन्ही मुलींचा विचार बदलला. त्यामुळे त्या पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या रेल्वेत बसल्या. मुली सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकात पाहोचल्या. रेल्वे स्थानकावरुन पुन्हा ऑटोरिक्षातून चिकलठाणा परिसरात पोहोचल्या. दरम्यान त्याच परिसरात पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत असताना त्यांना तिन्ही मुली दिसून आल्या. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं आणि याबाबत पालकांना माहिती दिली. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली सापडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच तपासणीनंतर बाल न्यायमंडळासमोर हजर केल्यानंतर संबंधितांचा ताबा पालकांकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.