Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात आता पावसाचा जोर वाढला असून पेरणीयोग्य पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. जिल्ह्यातील सिल्लोड भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी दुपारी वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन सख्या भावांचा समावेश आहे. शेतात पेरणी करण्यासाठी शिवारात गेले असता अंगावर वीज कोसळून दोन भावांचा मृत्यू झाला.
वीज कोसळून चार जणांचा मृत्यू
सिल्लोड तालुक्यातील सारोळा गै. गावात शेतात पेरणी करत असताना वीज पडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला. मृतांची नावे रोहित काकडे (वय 20) आणि यश काकडे (वय 17) अशी आहेत. ही दोघं भाऊ आपल्या आईसोबत शेतात पेरणीच्या कामात व्यस्त होते. अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार विजांचा कडकडाट सुरू झाला. याच वेळी वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळली, आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरी घटना मोढा बू. (ता. सिल्लोड) परिसरात घडली. येथे रंजना बापुराव शिंदे (वय 50) या महिला आपल्या गट क्रमांक 266 मधील शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.तिसरी घटना मौजे पिंपळदरी (ता. सिल्लोड) येथे घडली. येथेही वीज पडून शिवाजी सतीश गव्हाणे या युवकाचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ जीवन सतीश गव्हाणे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला
राज्यभरात सध्या पावसाची जोरदार हजेरी लागत असून मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला आहे. बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी बहुतांश ठिकाणी दिवसभर दमट वातावरण होते. अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी पडून गेल्या. काही भागात मुळसधार पाऊस झाला. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सूनची वाटचाल पाहता, पुढील काही दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: