छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) विद्यार्थी संघटनांचे (Student Politics) राजकारण तापण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह पद्धतीने भिंतलेखन केल्याच्या मुद्यावरुन आज विद्यापीठात राडा झाला. आंबेडकरवादी तरुणांनी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस विद्यापीठ परिसरात दाखल झाले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी बुधवारी विद्यापीठ बंदची हाक देण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत. विद्यार्थी संघटना आपल्या प्रचारासाठी भिंतलेखन, पोस्टर अशा विविध मार्गांचा अवलंब करतात. विद्यापीठ परिसरात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी Join ABVP, ABVP असे लिहिले आहे. मात्र, हे करताना विद्यापीठ परिसरात विद्रुपीकरण करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर Join ABVP लिहिण्यात आले. त्यावरून काही विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यापीठ परिसरात असलेल्या महापुरुषांच्या नावावर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेचे नाव लिहीले असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून हा वाद पेटला आहे. आज आंबेडकरवादी तरुणांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना याबाबत जाब विचारत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सध्या विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण आहे.
विद्यापीठ बंदची हाक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्रुपीकरण करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या विद्यापीठ परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व विद्यापीठ कॅम्पसमधील पुरोगामी आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी ही बंदची हाक दिली आहे.
एसएफआयकडून अभाविपचा निषेध
विद्यापीठ कॅम्पसमधील स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या विद्यार्थी संघटनेने अभाविपचा निषेध केला आहे. स्वतःला 'तथाकथित' विद्यार्थी संघटना म्हणवून घेणाऱ्या ABVP ची द्वेषमूलक विचारधारा ही मुळात मनुवादी विचारधारा असणाऱ्या या संघटनेच्या मनात बहुजनांच्या महापुरुषांच्या विषयी सतत द्वेष आणि आकस राहिलेला आहे आणि तो वेगवेगळ्या मार्गाने सतत बाहेर येत राहत असतो, असा आरोप एसएफआयचे जिल्हाध्यक्ष सत्यजीत म्हस्के यांनी केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात याच मनुवादी, गोडसेवादी संघटनेने त्यांच्या संघटनेच्या प्रचारासाठी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या फलकाचे विद्रुपीकरण करण्याचा मार्ग निवडला. ही बाब अतिशय गंभीर व निषेधार्ह आहे. विद्रुपीकरण करणाऱ्या अभाविपवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी एसएफआयने विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.