छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सोयगाव (Soygaon) तालुक्यातील न्हावी तांडा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या महिलेचा गावलागतच्या विहीरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रामपुरा शिवारात रविवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मीराबाई रघुनाथ राठोड (वय 52 वर्षे, रा. न्हावी तांडा) असे मयत महिलेचं नाव आहे. 


मीराबाई या 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी घरातून निघून गेल्या होत्या. त्यांच्या मुलाने आईचा गावात सर्वत्र शोध घेतला. तसेच नातेवाईकांना फोन करून देखील माहिती घेतली. मात्र त्या कुठेच मिळून आल्या नाही. त्यामुळे अखेर त्यांच्या मुलाने सोयगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आई हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी देखील मिसिंगची नोंद घेऊन महिलेचा शोध सुरु केला. दरम्यान, महिलेचा शोध सुरु असतानाच आज सकाळी गावालगत असलेल्या एका विहिरीत मीराबाई यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान याची माहिती तत्काळ स्थानिक पोलीस पाटील यांनी सोयगाव पोलिसांना दिली. तर, माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी घटनास्थळी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी शव नातेवाईकांच्या ताब्यात दिला. 


माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी...


आज सकाळी रामपुरा शिवारातील न्हावी तांडा परिसरात गावालगत एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, याची माहिती कळताच  रामपुरा तांड्याचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, गावात देखील याबाबत कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच महिलेचा मृतदेह बाहेर काढल्यावर मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मीराबाई यांचा असल्याचे स्पष्ट झाले. 


आत्महत्या की अपघात? 


दरम्यान मीराबाई या रागाच्या भरात घरातून निघून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, राग शांत झाल्यावर त्या घरी परत येत असतांना अंधारात त्यांना विहिरीचा अंदाज आला नाही आणि त्यांचा पाय घसरून त्या विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर, मीराबाई या रागाच्या भरात घरातून निघून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या तर केली नाही ना? असाही अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


सैराटच्या पुनरावृत्तीने संभाजीनगर हादरलं, प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या