Chhatrapati Sambhaji Nagar ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरकर उकाड्याने पुरते हैराण झाले होते. मात्र आज पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, त्यामुळे संभाजीनगरकर सुखावले आहेत. पावसाने शहरात आणि ग्रामीण भागात देखील हेजरी लाभली आहे. विशेष म्हणजे या वर्षातील हा पहिला पाऊस असून,पहिलाच पाऊस जोरदार झाल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केला जात आहे.
आज (10 जून) रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. दरम्यान चार वाजेनंतर ग्रामीण भागात पावसाला सुरवात झाली. ज्यात वैजापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. तर वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथेही पावसाने हजेरी लावली. तर सिल्लोडमध्ये देखील जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे. पैठण तालुक्यातील अडुळ येथेही जोरदार पाऊस कोसळला. तर छत्रपती संभाजीनगर शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता, मात्र संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. तर अनेकांनी पाहिल्याच पावसात भिजण्याचा आंनद घेतला. तर काही ठिकाणी बच्चेकंपनी यांनी देखील पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेतला.
जोरदार वारा....
आज दुपारपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार वारा पाहायला मिळतोय. यामुळे रस्त्यावर सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज खंडित झाली आहे. या वाऱ्याचा वेग एवढा होता की, रस्त्यावर दुचाकी चालवणे अशक्य होत होते. तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने देखील हजेरी लावली.
रिक्षांवर झाड कोसळले...
आज दुपारपासून छत्रपती संभाजी नगर मध्ये जोरदार वारा पाहायला मिळाला. दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरातील वेदांतनगर भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षांवर एक झाड अक्षरशः उन्मळून पडला. तर यात एक मुलगा गंभीर जखमी देखील झाला असल्याचे उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर झाडाखाली फसलेल्या रिक्षा काढण्यासाठी अग्निशमन दलाल माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पहिल्याच पावसाची जोरदार बॅटींग...
जून महिना सुरू झाल्यावर पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. सहसा 7 जून पासून पावसाळा सुरू होतो. पण यावेळी पावसाने उशिराच हजेरी लावली. मात्र पहिल्याच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.तर काही ठिकाणी गारपीट देखील दिसून आली.