Chhatrapati Sambhaji Nagar News : लग्न म्हटलं की रुसवे-फुगवे, किरकोळ वादही होतच असतात. अनेकदा मानपान किंवा इतर काही कारणांवरुन वधू-वर पक्षांमध्ये काही खटके उडतात. पण छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) एका गावात मानपानावरुन लग्नात (Wedding) तुफान राडा पाहायला मिळाला आहे. एवढंच नाही तर वधू-वर पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. तर जखमींवर पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र अद्याप कोणतीही तक्रार न आल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 


याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा गावात एक लग्न समारंभ पार पडला. या लग्नात पुण्याहून वऱ्हाड आलं होतं. विशेष म्हणजे लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून मुलीकडच्या मंडळीकडून जोरदार तयारी करण्यात येत होती. तर ठरल्याप्रमाणे शनिवारी लग्न समारंभ पार पडला. मात्र याचवेळी वधू-वर पक्षांमध्ये मानपानावरुन सुरुवातीला किरकोळ वाद झाला. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न देखील केला. पण पुण्याहून आलेल्या वऱ्हाडातील काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि वाद आणखीच वाढला. वाद एवढा विकोपाला गेला की, दोन्ही गटात तुंबळ हाणामारी सुरु झाली.


वर वधू पक्षातील 10 ते 12 जण जखमी


दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर हल्ला चढवत होते. यात महिलांना देखील मारहाण करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांकडून वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरु होता, मात्र वधू आणि वर दोन्ही बाजूची लोकं ऐकून घ्यायला तयार नव्हती. वाद आणखीच वाढत गेला आणि यात दोन्ही बाजूचे 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पाचोडच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. 


रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण!


लग्नात मानपानावरुन सुरु झालेला हा वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. दोन्ही बाजूचे तरुण एकमेकांमध्ये भिडले आणि थेट मारहाण सुरु झाली. एकमेकांना रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण सुरुच होती. यात महिलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. ज्यात काही महिलांचं डोकं फुटल्याने, रक्तस्त्राव सुरु झाला होता. सध्या गंभीर जखमींवर उपचार सुरु आहेत. मात्र दोन्ही गटातील लोकांनी पोलिसात तक्रार केली नसून, झालेला वाद आपापसात मिटवला असल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. पण या लग्नातील हाणामारीची परिसरात जोरदार चर्चा आहे.