Chhatrapati Sambhaji Nagar: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या एका वक्तव्याने आता पुन्हा एकदा औरंगजेबचा मुद्दा चर्चेत आला आहे. औरंगजेबाच्या कबरीला मी भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल थांबली असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिकिया येत आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी देखील यावर आपली प्रतिकिया दिली आहे. “कोणीतरी औरंगजेबाच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हा दाखल करतात, पण प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले तर तो त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आपला बाप आहे का?, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करून दाखवावे,"असं जलील म्हणाले आहेत. 


दरम्यान याबाबत बोलताना खासदार जलील म्हणाले की, "आमच्या सभेत औरंगजेबच्या घोषणा देण्यात आल्याचे म्हणणे चुकीच होते. कारण असे काही झालं नसल्याचे मला पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांचा दबाव होता असेही मला पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे जलील म्हणाले. पण प्रकाश आंबेडकर आपला बाप आहे का? हो बाप आहे म्हणून तर बोलत नाही. कोणीतरी औरंगजेबाच्या घोषणा दिल्या तर गुन्हा दाखल करायचा आणि प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले तर तो त्यांचा अधिकार असतो," असा टोलाही जलील यांनी लगावला. 


तुम्ही फक्त संशयावरून लोकांना मारत आहे. औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मोदी सरकारने दिले आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर औरंगजेबाच्या कबरीला देण्यात आलेलं संरक्षण काढा, जर तिथे जायचंच नाही तर विशेष दर्जा कशासाठी दिला. तसेच औरंगजेबाच्या कबरीवर इम्तियाज जलील गेले तर टीका केली जाते, मात्र प्रकाश आंबेडकर गेले तर तो त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेबांवर गुन्हा दाखल करून दाखवावे. इम्तियाज जलील कबरीवर गेल्यावर तणाव वाढतो आणि प्रकाश आंबेडकर गेल्यावर तणाव कमी झाला? असा टोलाही जलील यांनी लगावला. 


प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर उत्तर... 


औरंगजेबाच्या कबरीला मी भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. यावर उत्तर देतांना जलील म्हणाले की, "राज्यात कुठेही दंगली झालेल्या नाहीत. काही छोट्या-मोठ्या गोष्टी घडल्या असतील, मात्र कुठेही हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही. तसेच इम्तियाज जलील देशद्रोही असल्याची जी टीका माझ्यावर करतात, आता बाळासाहेब आंबेडकरांना कोणती पदवी देणार?" असेही जलील म्हणाले. 


भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर प्रतिकिया...


15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नसून, या दिवशी भारताची फाळणी झाली. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर प्रतिकिया देताना जलील म्हणाले की, “हेच वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केले असते तर वादळ आले असते. या माणसाने हे वक्तव्य केले आहे दुर्दैवाने त्याला खूप महत्व दिलं जात आहे. या देशात सगळ्यांसाठी एक कायदा नाही, देशात आता लोकशाही राहिलेली नाही. सध्या एक अजेंडा राबविण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युएसमध्ये जाऊन खोट बोलतात. माणिपूरमध्ये काय सुरू आहे, 300 चर्च जाळण्यात आले. नाशिकमध्ये संशयावरून हल्ले होत आहेत. हा भेदभाव नाही का?"असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


कबरीला भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा