छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने केलेला नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील ट्रक चालक आणि इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी मंगळवारी पेट्रोल टंचाई पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, अशातच अनेक ठिकाणी चक्क दुचाकीमधून पेट्रोल चोरीच्या घटना देखील समोर आल्या आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील औरंगपुरा भागात अशीच एक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, दुचाकीमधून पेट्रोल (Petrol) चोरी करणारा तरुण सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.
एकीकडे ट्रक चालकांचा संप असल्याने पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल मिळत नसल्याचे अनेक ठिकाणी चित्र पाहायल मिळत आहे. दुसरीकडे आपल्या दुचाकीमध्ये असलेल्या पेट्रोलचीही चोरी होऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा भागात रात्री उशीरा रस्त्यावर उभा असलेल्या दुचाकीमधुन पेट्रोलची चोरी होतानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. एक तरुण येतो आधी बनावट चावीने स्कुटीची डिक्की उघडतो आणि नंतर त्यातील पेट्रोल एका नळीच्या मदतीने सोबत असलेल्या कॅनमध्ये भरतो. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता दुचाकीमध्ये असलेले पेट्रोल सांभाळायची वेळ आली आहे.
आजही अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंदच...
नवीन वाहतूक कायद्याला विरोध करण्यासाठी इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे सोमवारी रात्री अचानक राज्यभरातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती होती. तसेच, दुसऱ्या दिवशी मंगळवारी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरील इंधन संपले होते. तर, संध्याकाळी बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडले होते. मात्र, रात्री उशिरा संप मागे घेण्यात आला होता. परंतु, असे असलं तरीही आज सकाळी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याचे चित्र आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
दरम्यान, अशीच काही परिस्थिती नांदेड जिल्ह्यात देखील पाहायला मिळाली होती. तर, यावर नांदेड जिल्हा प्रशासनाची प्रतिक्रिया आली आहे. "ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने काही वाहनचालकात संम्रभ दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरतांना दिसून येत आहे. याबाबत पेट्रोलपंप चालकांकडून आढावा घेतला असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा जिल्ह्यात नाही, हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या गरजेएवढेच नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेल घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टिने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग दक्ष आहे. नागरिकांनी सहकार्य करावे," असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या:
आठ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आई पसार; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना