छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या आई-वडीलांना हाताने, लाकडी दांड्याने आणि लाथांनी बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जोगेश्वरी येथे बुधवारी (ता.5) रोजी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या, जोगेश्वरी येथील 14 वर्षीय मुलगी, आई, वडील, भाऊ व बहिणीसह एका भाड्याच्या घरात राहतात. आई, वडील खाजगी नोकरी करतात. मंगळवारी (ता.4) रोजी नववीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत असतानाच आरोपी निलेश दुबिले, ऋषिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांनी तिला अश्लिल हातवारे करून तिचा पाठलाग करत असल्याचे तिने घरी आल्यानंतर सांगितले. तिची आई घराबाहेर आली असता तिघेही पळून गेले. त्यानंतर बुधवारी (ता.5) रोजी अंदाजे पाच ते साडे पाच वाजण्याच्या सुमारास 14 वर्षीय मुलगी घराचा ओटा झाडत असताना निलेश दुबिले, ऋषिकेष दुबिले, प्रतीक राजुपत हे तिला पाहून आवाज देऊन तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य करू लागले. याबाबत त्यांना विचारणा केली असता, तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच जे हातात येईल त्याने पीडित मुलीच्या आईला छातीवर लाथाने व डोक्यात दगड मारून जखमी केले.पोलिसांनी मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वडिलांना आरोपी तिघे मारत असताना प्रविण डिगंबर काजळे, कृष्णा काजळे, सतिश काजळे हे भांडण मध्ये पडले आणि त्यांनी मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या तिघांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. त्या तिघांसोबत आणखी काही मुले असण्याचा संशय आहे. ही मारहाणीची घटना घडत असताना लोकांची मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी निलेश दुबिले, ऋशिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं काय प्रकरण?
मुलीची छेड काढून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबीयांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना वाळूज भागातील जोगेश्वरी येथे समोर आली. टोळक्याने बुधवारी सकाळी 14 वर्षांच्या मुलीची छेड काढली. मुलगी शाळेतून परत आल्यावर तिने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आई, वडील, मुलगी आणि तिच्या बहिणी यांना टोळक्याने लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी प्रतीक सतीश राजपूत, ऋषिकेश रामनाथ दुबिले, रोहित शंकरसिंग बहुरे, नीलेश रामनाथ दुबिले यांच्यावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.