Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहर (Chhatrapati Sambhaji Nagar City) पोलिसांच्या सायबर क्राईमच्या (Cyber Crime) टीमने मोठी कारवाई करत, तब्बल 110 कोटींचा ऑनलाईन दरोड्याचा प्रयत्न उधळून लावला आहे. डायमंड विक्री करणाऱ्या मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे बँक ऑफ इंडियात असलेले खाते हॅक करून 110 कोटी रुपये परस्पर वळते करायचे आणि त्यातून क्रिप्टो करन्सी खरेदी करण्याचा कट रचणाऱ्या एका रॅकेटचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला.


दरम्यान या प्रकरणी देवप्रिया हॉटेलमध्ये छापा मारून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून सहा मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे. शेख इरफान शेख उस्मान (वय 23, रा. गवळीपुरा, छावणी), वसीम इसाक शेख (वय 36, रा. मदिना गल्ली, पडेगाव), शेख कानीत शेख आय्युब (वय19, रा. रूप महल कॉम्प्लेक्स, जिल्हाधिकारी कार्यालय रोड), अब्बास युनूस शेख (वय 34, रा. सागर ढाब्याच्या पाठीमागे, मिटमिटा), अमोल साईनाथ करपे (वय 24) कृष्णा बाळू करपे (वय 25, दोघे रा. कोडापूर झांजर्डी, पो. सो- लेगाव, ता. गंगापूर) अशी आरोपींची नावे आहेत. 


सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार रेज या डायमंड विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे बँक ऑफ इंडियाच्या ओपेरा हाऊस शाखेत खाते आहे. तर हे खाते इंटरनेट बँकिंगचा यूजर आयडी व पासवर्ड वापरून हॅक करून त्या खात्यातील 110 कोटी रुपये वळवले जाणार आहे. तसेच वळवण्यात येणाऱ्या रकमेतून क्रिप्टो करन्सी घेणार असल्याची माहिती सायबर ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांना मिळाली होती. त्यांनी याची महिती तत्काळ पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना दिल्यावर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. 


तत्काळ खाते डेबिट फीज करण्याची कार्यवाही


दरम्यान कॉर्पोरेट कंपन्यांचे खाते हॅक करून करोडो रुपयांचा घोटाळा करण्याच्या तयारीत असलेल्या या रॅकेटची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील हे उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांना घेऊन तत्काळ दूध डेअरी चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले. त्यांनी खात्याची सत्यता पडताळली असता स्टार रेज कंपनीचे ओपेरा हाऊस शाखेत खाते असून, ते ओव्हर ड्राफ्ट खाते असल्याचे समोर आले. तसेच, खात्यात 110 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली. तर खात्यात मोठी रक्कम असल्याने इंटरनेट बँकिंगच्या लॉग-इनची माहिती घेऊन ही रक्कम वळती केली जाऊ शकते, असा पोलिसांना धोका वाटत असल्याने त्यांनी तत्काळ बँक आणि संबंधित कंपनीशी बोलून हे खाते डेबिट फीज करण्याची कार्यवाही केली. त्यानंतर पोलिसांना खात्री पटली, की किमान पैसे जाणार नाहीत. त्यानंतर आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 


उपसरपंचासह किराणा चालवणारा आरोपी 


विशेष म्हणजे यातील सहाही आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. वसीमला टक्केवारीवर पैसे देण्याच्या आमिषावर तो या रॅकेटमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर वसीमने इरफानला यासाठी तयार केले. इरफानने ओळखीचा बी. टेकचा विद्यार्थी कानितला यात समावून घेतले. गंगापूर तालुक्यातील कोडापूर झांजर्डीचा उपसरपंच अमोल भावासह सहभागी झाला. इरफानचे हॉटेल आहे, वसीम खासगी नोकरी, आब्बास युनूसचे वेल्डिंगचे आणि कृष्णाचे किराणा दुकान आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न भंगले, तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; दामिनी पथकामुळे वाचला जीव