Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्यावर्षी शिवसेनेत (Shiv Sena) बंद झाले आणि एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्यासह आमदारांचा एक मोठा गट उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून गेला. दरम्यान, त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करत राज्यात नव्याने सरकार स्थापन केले. यावरून विरोधकांकडून सतत शिंदे गटावर गद्दार आणि खोके सरकार अशी टीका झाली. मात्र काही दिवसांपूर्वी शिंदे यांची फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रियता असल्याची जाहिरात छापून आली तेव्हापासून भाजप नेत्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यानंतर नांदेडमध्ये 50 खोके आणि 105 डोके असे बॅनर लावण्यात आले. त्यातच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने चंद्रकांत पाटील 'डोकेवाले' मंत्री असून, 'खोकेवाले' नाहीत असा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले आहे. 


भाजपचे नेते माजी आमदार श्रीकांत जोशी अध्यक्ष असलेल्या टीचर्स एज्युकेशन सोसायटी संचलित विज्ञान वर्धिनी शाळेचे डॉ. रवींद्र कुलकर्णी हे माजी विद्यार्थी आहेत. तर त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल शाळेने त्यांचा शनिवारी सत्कार केला.


दरम्यान, याचवेळी अध्यक्षीय समारोपात माजी आमदार जोशी यांनी बोलताना काही फटकेबाजी देखील केली. "भाजपचे केंद्रात आणि राज्यातही सरकार आहे. त्याची तुम्हाला मदत होईल. त्यातच तुम्हाला चंद्रकांत पाटील हे 'डोकेवाले' मंत्री मिळाले आहेत. ते 'खोकेवाले' नाहीत. त्यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, अशा शब्दात भाजपचे नेते, माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच अप्रत्यक्षपणे टीका केली. 'लोकमत'ने याबाबत वृत्त दिले आहे. 


याचवेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, पदवीधरचा आमदार म्हणून काम करताना शिक्षण क्षेत्राचा जवळून अनुभव आला. मी ज्या महाविद्यालयात शिकलो ते प्राचार्य ना. य. डोळे यांच्या नावाने प्रसिद्ध होते. आताही शिक्षकांच्या नावानेच शाळा, महाविद्यालयांची ओळख असावी. मी शिक्षण मंत्री झाल्यास पहिल्यांदा उच्च शिक्षण विभागाची सहसंचालक कार्यालये बरखास्त करून टाकेन. सर्व कारभार कुलगुरूंच्या हातात देईन, असेही जोशी म्हणाले. 


आता भाजप नेतेही म्हणू लागले खोकेवाले मंत्री


शिवसेनेत बंडखोरी करून नव्याने सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर विरोधक 50 खोकेवाले म्हणून सतत हल्लाबोल करत असतात. अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील शिंदे गटाच्या नेत्यांना '50 खोके, एकदम ओक्के' अशा घोषणाबाजीचा सामना करावा लागला आहे. असे असताना भाजपच्या नेत्यांकडून देखील आता 'खोकेवाले' असा उल्लेख होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील नांदेडमध्ये तुमचे 50 खोके अन् आमचे 105 डोके असे बॅनर लागले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nanded Poster: 'तुमचे 50 खोके अन् आमचे 105 डोके'; नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला डिवचणारे पोस्टर्स