Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात (Accident) जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करत पेटवून दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. तसेच अग्निशमक दलाला पाचारण करून पेटवून दिलेली बसची आग विजवण्यात आली आहे. शाहरुख पठाण (वय 4 वर्षे) असे मयत मुलाचं नाव आहे. तर, याच अपघातात मुलाची आई देखील जखमी झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख पठाण आपल्या आईचा बोट धरून किराणा दुकानात जात होता. याचवेळी तिथून जाणाऱ्या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. ज्यात आई गंभीर जखमी झाली. मात्र, शाहरुख पठाण बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाला डॉक्टरांनी मुलाला मयत घोषित केले.
संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड करत पेटवून दिली...
चितेगाव येथील पांगरा रोडवर एका शाळेच्या बसने आई-मुलाला धडक दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. मुलाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेची बसची तोडफोड केली. बसच्या संपूर्ण काचा फोडण्यात आल्या. काही लोकांनी मध्यस्थी करून गर्दी पांगवली. मात्र, त्यानंतर काही अज्ञात लोकांनी बस पेटवून दिली. ज्यात बस अक्षरशः जळून खाक झाली आहे. मुख्य रोडवर बस जळत असल्याने नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच काही क्षणात अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग विजवण्यात आली. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.
पोलीस घटनास्थळी दाखल...
चितेगाव येथील पांगरा रोडवर एका शाळेच्या बसने आई-मुलाला धडक दिल्यानंतर संतप्त जमावाने बस पेटवून दिल्याची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पोहचेपर्यंत बस संपूर्ण जळून खाक झाली होती. दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा पंचनाम करण्यात येत असून, काही वेळात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Crime News : संभाजीनगर जिल्ह्यात एकाच रात्री दोन एटीएम फोडले; चोरांचा 38 लाखांवर डल्ला