मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याच्या निर्णयानंतर सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यामुळे आता यापुढे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर" असा उल्लेख केला जाणार आहे.
यापुढे विद्यापीठाचे नाव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर असे होईल. या विद्यापीठासमोर नमूद जिल्ह्यांच्या सूचित देखिल औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद ऐवजी धाराशिव असा बदल करण्यात येईल. नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विषय, नवीन महाविद्यालये, अतिरिक्त तुकड्या सुरु करण्यासाठी आता पूर्वीच्या तारखेत बदल करण्यात येऊन 15 नोव्हेंबर 2023 पूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे विहित नमुन्यात अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विद्यापीठावरील औरंगाबाद नामांतराला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी
मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याची मागणी होत होती. दरम्यान. राज्यात सरकार स्थापन होताच शिंदे सरकारने याबाबत निर्णय घेत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. केंद्राने देखील याला मंजुरी दिली. त्यामुळे या दोन्ही शहराचे नावं अधिकृतरीत्या बदलले आहे. सोबतच आता या दोन्ही शहरातील शासकीय कार्यालयावर असलेल्या नावात देखील बदल करण्यात येत आहे. तर, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ्यावरील औरंगाबाद नावात सुद्धा बदल करून, त्या जागी छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.
असा होईल बदल....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंर्तगत विभागातील सर्वच जिल्ह्यात शेकडो महाविद्यालय आहेत. या सर्व महाविद्यालयाला विद्यापीठकडून होणाऱ्या होणाऱ्या पत्र व्यवहार, तसेच दिले जाणारे गुणपत्रिका या सर्वांवर यापूर्वी औरंगाबाद असाच उल्लेख असायचा. तसेच विद्यापीठात असलेल्या फलकांवर आणि मुख्य कार्यालयात देखील औरंगाबाद असेच नाव होते. मात्र, सरकारच्या निर्णयानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणि त्यांच्या अंर्तगत येणाऱ्या महाविद्यालयांच्या शासकीय कागदोपत्री जिथे जिथे औरंगाबाद असा उल्लेख असेल त्या सर्व ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: