Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली बुडालेल्या बँक आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी काढण्यात आलेल्या आंदोलनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला असून, ठेवीदार आक्रमक झाल्याने पोलिसांना अक्षरशः अश्रुधुराचा मारा लागला. सध्या आंदोलक थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घुसले असून, आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तसेच लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका जलील यांनी घेतली आहे. 


जलील यांनी काढलेल्या मोर्च्यात मोठ्या संख्येने वृद्ध व्यक्तीसह पुरुष आणि महिला सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेत घोटाळा झाल्याचा समोर आले होते. तेव्हापासून ठेवीदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी जलील पाठपुरावा करत आहेत. सोबतच अनेक बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्याने तेथील ठेवीदारांचे देखील पैसे अडकले आहेत. त्यामुळे या सर्व ठेवीदारांनी जलील यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मात्र, लेखी आश्वासन मिळत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले. तसेच, जलील यांच्यासह आंदोलकांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. 


पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा


खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्याप्रमाणात ठेवीदार या ठिकाणी एकत्र आले होते. दरम्यान, यावेळी इम्तियाज जलील यांचे भाषण झाले. त्यानंतर आंदोलकांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले होते. यावेळी महिला आंदोलक प्रचंड आक्रमक झाल्या. याचवेळी जलील यांनी देखील गेटवरून चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि ते आतमध्ये घुसले.दरम्यान, आंदोलकांनी देखील आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागल्याने पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. शेवटी आंदोलकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांनी थेट अश्रुधुराचा मारा केला. त्यामुळे गोंधळ उडाला आणि आंदोलकांची पळापळ पाहायला मिळाली. यात काहीजण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


जलील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सकाळपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, गोंधळानंतर आता आणखी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी थांबून आहे. तर, दुसरीकडे जलील लेखी आश्वासनावर ठाम आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! आयफोनसाठी वीस वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, संभाजीनगरमधील घटना