Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील पडेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, बहिणींसोबत खेळत असताना गॅसवरील गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (11 जुलै) रोजी रात्री उपचार सुरु असताना चिमुकलीचा मृत्यू झाला. शिद्रा हारून शेख (2 वर्षे)  असे चिमुकलीचं नाव आहे. वडिलांच्या आंघोळीसाठी आईने गरम पाणी ठेवल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


अधिक माहिती अशी की, वडीलांना अंघोळीसाठी गरम करुन ठेवलेले पाणी दोन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर सांडल्याने गंभीर भाजलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सात जुलै रोजी घडली होती. तेव्हापासून चिमुकलीवर घाटीत उपचार सुरु होते. अखेर चिमुकलीने मंगळवारी (11 जुलै) रात्री साडेआठ वाजता प्राण सोडले. या घटनेची नोंद छावणी पोलिसांत करण्यात आली आहे. 


हारुण शेख हे बाहेरून घरी येत होते, त्यामुळे त्यांच्या अंघोळीसाठी पत्नीने पाणी गरम करुन ठेवले होते. तर हारुण यांच्या पत्नी बाथरुममध्ये होत्या. पाणी गरम ठेवले होते. तिथे गॅसजवळ हारुण यांच्या तीन मुली खेळत होत्या. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाच्या मुलीच्या अंगावर खेळता खेळता गरम पाणी सांडले. दरम्यान मुलीचे ओरडण्याचा आवाज आल्याने आईने तत्काळ धाव घेतली. यात शिद्रा गंभीर भाजली होती. तिच्यावर घाटीत उपचार सुरु असताना 11 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.


चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू 


शिद्राचे कुटुंब पडेगावात कासंबरी दर्गा परिसरात राहते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता तिचे वडील बाहेर गेले. दुपारी 1 वाजता घरी येण्यापूर्वी त्यांनी पत्नीला फोन करून स्नानासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवण्यास सांगितले. त्यामुळे शिद्राच्या आईने गॅसवर पाणी ठेवले आणि बाथरूम मध्ये गेली. याच दरम्यान दोन मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता गॅसजवळ आल्याने शिद्राचा धक्का लागला व त्यातील पाणी तिच्या अंगावर पडले. शिद्राचे किंचाळत रडणे ऐकून आईने धाव घेतली. इतरांच्या मदतीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र 11 जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्त्यू झाला. या घटनेने शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! अल्पवयीन मुलांमधील प्रेमप्रकरण ठरतोय पालकांसाठी चिंतेचा विषय, औरंगाबादेत सहा महिन्यात 134 मुलांनी घर सोडले