Aurangabad News : औरंगाबादमध्ये (Aurangabad) एक धक्कादायक घटना समोर आली असून, एकाच दिवशी भाऊजीची अन् मेहुण्याने वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या (Suicide) केली आहे. मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून भाऊजीने विष प्राशन करून, तर मेहुण्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कन्नड तालुक्यातील टाकळी अंतुर आणि सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे एकाच दिवशी या दोन्ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू लिंबाजी गायकवाड (वय 32 वर्षे, रा. मृत राजू गायकवाड टाकळी अंतुर, ता. कन्नड) व विनोद शालिक बनसोड (वय 30 वर्षे, रा. हट्टी, ता. सिल्लोड) असे आत्महत्या करणाऱ्या भाऊजी व मेहुण्याचे नाव आहे.


अधिक माहिती अशी की, टाकळी अंतुर-चिंचोली लिंबाजी रस्त्याला लागून असलेल्या गट नं 201 मधील शेतात राजू गायकवाड हे वास्तव्य करत होते. आई, वडील व दोन्ही भावातून विभक्त राहत होते. राजू याचा अकरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण लग्नाला 11 वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने ते सतत तणावात व नैराश्यात राहायचे. दरम्यान, राजू यांची पत्नी चार-पाच दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. राजू हे घरी एकटेच होते. शुक्रवारी सकाळी राजू यांनी शेतातील राहत्या घरात विष प्राशन केले. 


मेहुण्याने देखील केली आत्महत्या....


दुसरीकडे याच दिवशी सिल्लोडच्या हट्टी येथील युवा शेतकरी तथा राजू गायकवाड यांचे मेहुणे विनोद बनसोडे यांनी देखील आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावातीलच स्वतःच्या गॅरेजमध्ये विनोद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात काहीच पिकत नसल्याने त्यांनी स्वतःचा गॅरेज टाकला होता. पण, मागील काही दिवसांपासून त्यांची आर्थिक परीस्थिती बेताचे होती. त्यात बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केली. पण पावसाने पाठ फिरवल्याने शेतातून काही हाती येण्याची अपेक्षा कमी झाली होती. डोळ्यासमोर नापिकी दिसून येत असल्याने बँकेच्या कर्जासह इतर खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. एकाच दिवशी भाऊजीची अन् मेहुण्याची आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


घाटी रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू 


राजू गायकवाड यांनी शेतातच विष प्राशन केले. तसेच याबाबत शेतात वखरणीचे काम करत असलेल्या बापू मोरे यांना सांगितली. मोरे यांनी तत्काळ त्यांचा मोठा भाऊ विजू गायकवाड यांना ही माहिती दिली. त्यांनी तातडीने मित्रांच्या मदतीने राजू यांना चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी रेफर करण्यास सांगितले. सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथे जाण्यास सांगितले. मात्र, शासकीय घाटी रुग्णालयात पोहोचण्याआधीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


कुठे गुंडांचा हैदोस, तर कुठं नशेखोरांची हुल्लडबाजी; औरंगाबादेत गुन्हेगारांमधील पोलिसांचा धाक उरला नाही?