Aurangabad News : औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे नवरदेवाच्या मिरवणुकीत मशीदसमोर डीजे वाजवण्याच्या कारणावरून वऱ्हाडी मंडळीत आणि गावातील एका गटात बाचाबाची झाली आणि त्यातून दंगल झाल्याची घटना दोन महिन्यापूर्वी समोर आली होती. दरम्यान, आता गावातील हिंदू-मुस्लिम समाजाच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला असून, 35 जणांवरील दंगलीचा गुन्हा रद्द करण्यात आला आहे. गावातील नागरिकांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देत, दोन समाजात ऐक्य प्रस्थापित होणे आश्वासक बाब असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने गुन्हा रद्द केला आहे. 


कन्नडच्या शेलगाव येथे फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील मंडळी 29 जून 2023 रोजी लग्नसोहळ्यासाठी आली होती. लग्नातील नवरदेवाची वरात मिरवणूक सुरू असताना वरात शेलगाव येथील मशिदीसमोर आली. यावेळी काही लोकांनी मशीदसमोर डीजे बंद करण्याची विनंती केली. मात्र मशिदीसमोर डीजे वाजवू नका, तशी प्रथा आमच्या गावात नाही असे एकाने वरातील नाचणाऱ्या तरुणांना सांगितले. बोलताबोलता वाद वाढला. एका गटाच्या आरोपीने थेट चाकूने दुसऱ्या गटाच्या व्यक्तीवर हल्ला करत वार केला. हल्ल्यात दोन्ही गटांतील दोघे गंभीर जखमी झाले. त्यामुळे गावात दोन गट आमने-सामने आले होते. पोलिसांनी या प्रकरणी दंगलीचे गुन्हे दाखल केले होते. 


न्यायालयाने दिले असे आदेश... 


शेलगाव गावातील वादात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द व्हावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात अॅड. अभयसिंह भोसले, अॅड. नीलेश देसले आणि अॅड. मिथुन भास्कर यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. दोन गटात झालेल्या हाणामारीत कुणालाच गंभीर जखमा झालेल्या नव्हत्या, तसेच पूर्वीचे गुन्हेदेखील दाखल नव्हते. अशा प्रकारे दोन समाजात ऐक्य प्रस्थापित होणे आश्वासक बाब असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने गुन्हा रद्द केला आहे. तर, आरोपांनी प्रत्येकी पाच हजार रुपये म्हणजे एकूण 1.75 लाख रुपये दत्ताजी भाले रक्तपेढी व खंडपीठाच्या वाचनालयास समान विभागून देण्याचे निर्देश दिले.


राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे वाढला होता वाद 


मशीदसमोर डीजे बंद करण्याच्या कारणावरून दोन गटात आधी सुरवातीला वाद झाला होता. दरम्यान, याचवेळी काही राजकीय लोकांनी या वादात हस्तक्षेप केला होता. त्यामुळे वाद मिटण्याऐवजी आणखीनच वाढत गेला. शेवटी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गावात धाव घेतली. त्यानंतर थेट दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 


संबंधित बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा दोन गटात राडा; पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन