औरंगाबाद : तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळावा म्हणून, एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी धनगर समाजाला दिलास देण्यासाठी मेंढ्यांचा (Sheep) 1 रुपयांत विमा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली आहे. सिल्लोड येथे राज्यव्यापी धनगर समाज निर्धार मेळाव्यात बोलतांना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन मुंबई येथे बैठक घेऊन धनगर समजाचे प्रश्न मांडणार असल्याचे सत्तार म्हणाले आहे. 


राज्यातील धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असून, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड येथील धनगर मेळाव्यात बोलतांना म्हणाले. तर, मेंढपाळांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने तसेच मेंढ्याना एक रुपयांत विमा मिळावा, तसेच धनगर समाजाच्या विविध समस्यांसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची वेळ घेवून मुबंई येथे बैठक घेऊ असे मंत्री सत्तार म्हणाले. सिल्लोड शहरातील शिवसेना भवनच्या प्रांगणात आज (13 ऑगस्ट) रोजी अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाचा राज्यव्यापी निर्धार मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.


पुढे बोलत असतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, बदलत्या युगात देखील धनगर समाजाने आपले रूढी परंपरा जपली आहे. मात्र, स्पर्धेच्या या युगात समाजातील पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले पाहिजे. धनगड आणि धनगर याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच वन विभागाच्या जागेवर मेंढ्याना चरण्यासाठी परवानगी मिळावी, मेंढ्याना विमा संरक्षण मिळावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सत्तार म्हणाले. 


पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचा भव्य पुतळा उभारणार...


पुढे याप्रसंगी अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोड येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचा भव्य पुतळा व प्रवेश द्वार उभारणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात करू. प्रवेश द्वारासाठी 25 लाख रुपये मंजूर केल्याचे सांगत, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या जयंतीपर्यंत हे काम पूर्ण करून अनावरण करण्याचा प्रयत्न असेल असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. 


पीक विम्याचा देखील घेतला होता निर्णय...


राज्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा देण्याची कल्पना तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची होती. त्यानंतर आता त्यांनी मेढ्यांचा एक रुपयात विमा काढण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडणार असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: