Aurangabad News : टोमॅटोचे (Tomato) भाव गगनाला भिडल्यामुळे टोमॅटोच्या शेतातून टोमॅटो चोरीला जायला लागलेत. त्यामुळे औरंगाबादच्या (Aurangabad) एका शेतकऱ्याने टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून चक्क आपल्या टोमॅटोला सीसीटीव्हीचं (CCTV) कवच दिलं आहे. संपूर्ण टोमॅटोच्या दीड एकर शेतीभोवती सीसीटीव्ही बसवले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर गावच्या शरद रावते या शेतकऱ्यांने हे सीसीटीव्ही बसवले आहेत. यासाठी त्यांनी तब्बल 22 हजार रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे परिसरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
मागील काही दिवसांत टोमॅटोला चांगला दर मिळत असून, काही ठिकाणी हा दर 200 रुपये किलोवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे टोमॅटो लावणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. पण, टोमॅटोला अधिकचा दर मिळत असल्याने यावर आता चोरांची नजर पडली आहे. त्याचं कारण म्हणजे औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर येथील शरद रावते यांच्या शेतातील टोमॅटो अक्षरशः चोरीला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टोमॅटोच्या चोऱ्या रोखण्यासाठी रावते यांनी शक्कल लढवत चक्क टोमॅटोच्या पिकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
पाहा व्हिडीओ : Chhatrapati Sambhajinagar Tomato CCTV : शेतातून टोमॅटोची चोरी, शेतीला सिसीटीव्हीचे कवच
शरद रावते यांच्याकडे एकूण अडीच एकर शेती आहे. दरवर्षी ते आपल्या शेतात टोमॅटोची लागवड करतात. दरम्यान, यंदाही त्यांनी आपल्या दीड एक्कर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. रोप आणण्यापासून तर औषध फवारणी, बांधणी, मजुरी असा त्यांना एकूण 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तसेच पुढील आठ ते दहा दिवसात टोमॅटो तोडणीला येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच शेतातील टोमॅटोची चोरी होत असल्याने ते अडचणीत सापडले होते. शेवटी यावर पर्याय म्हणून त्यांनी संपूर्ण टोमॅटोच्या शेतात सीसीटीव्ही बसवले आहे.
चोरीच्या घटनांनी शेतकरी वैतागले...
गंगापूरच्या लासूर स्टेशन परिसरात दरवर्षी शेतकरी भाजीपाला लागवड करतात. त्यातून अनेकदा एखांद्या पिकाची लॉटरी लागून जाते. दरम्यान, याच परिसरातील आसेगाव, शहापूर बंजर, आंबेगाव, खोजेवाडीसह इतर गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. त्यामुळे सध्याचा भाव पाहता या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मात्र, रात्रीच्या सुमारास टोमॅटोची चोरी होत असल्याने शेतकरी वैतागले आहे. तर अनेक शेतकऱ्यांना रात्रीचा मुक्काम शेतात करण्याची वेळ आली आहे. तर काही शेतकरी यावर आता सीसीटीव्हीचा पर्याय शोधत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :