औरंगाबाद : वाढत्या गुन्हेगारीमुळे आधीच चर्चेत आलेल्या औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांना एकाच दिवशी दोन एटीएम (ATM) फोडून आणि एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याने एकप्रकारे चोरट्यांनी आव्हान दिले आहे. शहरात रविवारी मध्यरात्री आंतरराज्य टोळीने दीड तासात दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखो रुपये पळवल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वाळूज भागातील रांजणगावच्या एचडीएफसीच्या एटीएम आणि कांचनवाडीच्या एसबीआयचं एटीएम फोडण्यात आले आहेत. ज्यात कांचनवाडीच्या सेंटरमधून एटीएममधून 22 लाख 77 हजार रुपये चोरांनी लंपास केले. विशेष म्हणजे याचवेळी एन-2 भागात एका चोराने एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो फसल्याने चोरट्याने पळ काढला.
पहिली घटना...
रविवारी रात्री दोन वाजता पहिली घटना औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील कांचनवाडीत घडली. मुख्य रस्त्यावरच असलेल्या शिवनेरी कॉम्प्लेक्समधील एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर फोडण्यात आले. चार ते पाच जणांचे टोळक्याने एटीएम सेंटरपासून काही अंतरावर कार उभी केली होती. एटीएमवर आल्यावर चोरांनी आधी सीसीटीव्हीवर स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरने एटीएम मशिनचे कॅश ट्रेच तोडत 22 लाख 77 हजार 500 रुपये चोरले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे.
दुसरी घटना...
दुसरी घटना वाळूज भागातील बजाजनगरातील जयभवानी चौकात उघडकीस आली आहे. यावेळी एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एटीएम परिसरात चोर दाखल झाले. सुरवातीला त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. सोबतच वीजपुरवठा खंडित करून आत प्रवेश केला. गॅस कटरने एटीएम फोडून कप्प्यात ठेवलेली रोकड लांबवली. मात्र, या ठिकाणी एकूण किती रक्कम चोरीला गेली याची माहिती रात्री उशिरापर्यंत कळू शकली नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी पाहणी केली. विशेष म्हणजे कांचनवाडी आणि बजाजनगरातील एटीएम फोडणारी टोळी एकच असल्याचा अंदाज आहे.
कंपन्यांचा हलगर्जीपणा!
शहरातील एटीएमची जबाबदारी वेगवेगळ्या खाजगी कंपनीकडे बँकेकडून देण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील अनेक एटीएम रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नाही, काही ठिकाणी चांगली अलार्म यंत्रणाच नाही. असे काही एटीएम आहेत ज्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील सुरु नाहीत. त्यामुळे अशाच एटीएमची पाहणी करून चोर त्यांना टार्गेट करतात. त्यामुळे कंपन्यांचा हलगर्जीपणामुळेच अशा घटना घडतांना अनेकदा समोर आले आहेत. मात्र, याचा बोझा पोलीस यंत्रणेवर पडतो.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad : घरात हीटर लावत असताना घडलं भयंकर, महिलेचा जागीच मृत्यू; औरंगाबादच्या सिल्लोडमधील घटना