Adarsh Scam : औरंगाबादच्या (Aurangabad) आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank) गैरव्यवहारासंदर्भात गुन्हे दाखल झाले असून, पोलीस व सहकार विभाग यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे. तथापि, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी राबवावयाच्या प्रक्रियेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासंदर्भात उपाययोजनांची माहिती पालकमंत्री भुमरे यांनी घेतली, यावेळी ते बोलत होते. तर आठ दिवसांत या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करणार असल्याचे देखील भुमरे म्हणाले आहे


यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवावी. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून  केलेल्या कारवाईची माहिती परस्परांना द्यावी. तसेच होत असलेल्या वसुलीची व ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेची ठेवीदारांनाही वेळोवेळी माहिती द्यावी. बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधिकाऱ्यांनी संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी होत असलेल्या कारवाईची माहिती दिली. सहकार विभागाने संस्थेचे लेखापरीक्षण, संस्थेच्या कर्जांची माहिती, त्यांची वसुली, संचालकांवर निश्चित करावयाची जबाबदारी इ. बाबत माहिती दिली. 


तर, कर्ज वितरणात झालेल्या अनियमिततेबाबत सहकार आयुक्तांच्यास्तरावरुन समिती नेमून चौकशी व्हावी, अशी सुचना यावेळी भुमरे यांनी केली. संस्थेच्या तसेच संचालकांच्या मालमत्तांची, संदिग्ध व्यक्ती व मालमत्तांची  माहितीही नोंदणी कार्यालयाकडे द्यावी. जेणेकरुन अशा मालमत्तांचे व्यवहार होता कामा नये, असेही भुमरे म्हणाले.


ठेवीदारांना मिळतोय राजकीय पाठिंबा...


औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार समोर आला असून, 200 कोटींपेक्षा अधिकचा हा आकडा आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याचवेळी ठेवीदारांना राजकीय पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा काढत ठेवीदारांना पाठिंबा दर्शवला. तसेच याबाबत सतत आढावा घेऊन कारवाईसाठी प्रशासकीय यंत्रणाच्या संपर्कात आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री भुमरे यांनी देखील बैठक घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच घोटाळ्यातील ठेविदारांच्या ठेवी परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा असे निर्देश दिले आहेत. सोबतच इतर राजकीय पक्ष आणि संघटनांनी देखील ठेविदारांच्या पाठीशी असल्याचा दावा केला आहे. तसेच लवकरात लवकर तपास करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी देखील केली जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


आधी तीस-तीस अन् आता 'आदर्श घोटाळा'; वर्षभरात दोन मोठ्या घोटाळ्याने औरंगाबाद हादरलं