Balasaheb Thackeray Apla Davakhana: महाराष्ट्र राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरीकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" ही योजना सरकारकडून सुरु करण्यात येत आहे. दरम्यान शहरी भागातील एकुण लोकसंख्येपैकी साधारणतः 12,000 ते 20,000 लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे "हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" स्थापन केले जाणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) देखील असे एकूण 29 दवाखाने सुरु करण्यात येत असून, उद्या 1 मी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन केले जाणार आहे. 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 29 ठिकाणी सुरवातीला 'हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यात येत आहे. ज्यात औरंगाबाद मनपा हद्दीत 12 दवाखाने,  छावणी मंडळ 02 दवाखाने, पैठण नगर परिषद 02 , गंगापूर नगर परिषद 02, वैजापूर 03, फुलंब्री नगर पंचायत 01, खुलताबाद नगर परिषद 01, सिल्लोड नगर परिषद 02,सोयगाव नगर पंचायत 01, कन्नड नगर परिषद 03 असे एकूण 29  दवाखाने सुरु करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दवाखान्यांचे उद्या ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि गोरगरिबांना या 'आपला दवाखाना'चा  मोठं फायदा होणार आहे. 


'या' असतील आरोग्य सेवा बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी 02.00 ते रात्री 10.00 )



  • मोफत औषधोपचार

  • मोफत तपासणी

  • टेलीकन्सल्टेशन

  • गर्भवती मातांची तपासणी

  • लसीकरण

  • महिन्यातुन निश्चित दिवशी नेत्र तपासणी 

  • बाह्य यंत्रणेद्वारे (M/S. HLL) रक्त तपासणीची सोय

  • मानसिक आरोग्यासाठी समूपदेशन सेवा

  • आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा


बाह्यरुग्ण विभागातील सेवा विशेषज्ञांमार्फत प्रदान करण्यात येतील. (सदर तज्ञ सेवा ह्या सायंकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील)



  • भिषक (फिजीशियन)

  • स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ

  • बालरोग तज्ञ

  • नेत्ररोग तज्ञ

  • त्वचारोग तज्ञ

  • मानसोपचार तज्ञ

  • कान नाक घसा तज्ञ


'या' केंद्रांमध्ये पुढील प्रमाणे मनुष्यबळाचा समावेश असणार 



  • वैद्यकिय अधिकारी

  • स्टाफ नर्स

  • बहुउद्देशिय कर्मचारी

  • अटेंडंट / गार्ड आणि

  • सफाई कर्मचारी


गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस


शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने बसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्ती पासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे, काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहेत. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापुर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरीता "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" च्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस, असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Talathi : तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रही तलाठीमुक्त होणार?; कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले?