BJP Protest On Abdul Sattar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) एन्ट्रीनंतर सत्तधारी पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. तर राष्ट्रवादीसोबत (NCP) आल्याने भाजप-शिवसेनेते सर्वकाही आलबेल नसल्याची देखील चर्चा आहे. एकीकडे अशी चर्चा सुरु असताना दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिंदे गटाचे नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) क्रांती चौकात सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन जोरदार आंदोलन केले आहे. तर सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत घोषणाबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले.
अब्दुल सत्तार यांनी अनेकांच्या जीमिनी हडप केल्या आहेत. मंत्री झाल्यापासून त्यांचे जनतेवरील अत्याचार अधिकच वाढले असल्याचा आरोप करत काही समाजिक कार्यकर्त्यांनी आज औरंगाबादच्या क्रांती चौकात आंदोलन केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यानंतर शिवसेनेला भाजपचा हा आणखी एक धक्का मानला जात आहे.
काय म्हणाले आंदोलक?
दरम्यान औरंगाबादमध्ये कृषीमंत्री सत्तार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी प्रतिकिया दिली आहे. अब्दुल सत्तार मंत्री झाल्यापासून त्यांनी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरु केला आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा. गोरगरीब यांच्या जमिनी हडपणे, वाळू तस्करी करणे, जमीन न दिल्यास बळजबरीने जमीन हडपण्याचे काम सत्तार यांनी केला असल्याचा आरोप यावळी करण्यात आला. तसेच राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा कोणी मंत्री असेल तर ते अब्दुल सत्तार आहेत असा आरोप देखील आंदोलकांनी यावेळी केला.
अर्धनग्न आंदोलन
औरंगाबादच्या क्रांती चौकात आज कृषिमंत्री सत्तार यांच्याविरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अंगावरील शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केले. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर अब्दुल सत्तार यांचे करायचे काय खाली मुंडके वरती पाय, राजीनामा द्या राजीनामा अब्दुल सत्तार राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या.
भाजप कार्यकर्ते म्हणतात....
दरम्यान यावेळी आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते म्हणाले की, आम्ही सत्तेत सोबत असलो तरीही आमचा सिल्लोड तालुका सत्तार यांच्यामुळे त्रस्त आहे. त्यामुळे आमच्या तालुक्यातील लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची शिकवण आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे सत्तेत सोबत असलो तरीही आम्ही सत्तार यांच्यासारख्या अन्याय मंत्र्यांच्या विरोधात आम्ही लढत राहू अशी प्रतिकिया आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या: