औरंगाबाद: शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. तर, मंत्र्यांनी येऊन या मोर्चेकऱ्यांशी संवाद साधावा अन्यथा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेऊ अशी भूमिका जलील यांनी घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्च्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे. 


दरम्यान याबाबत बोलताना जलील म्हणाले की, "आदर्श नागरी पतसंस्थेचे व संचालक मंडळाच्या मालमत्तेचे निलामी करुन गोरगरीब, वयोवृद्ध, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यात यावे, आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखाची तात्काळ मदत करण्यात यावी, रुग्णालयात भरती ठेवीदारांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच महाघोटाळ्यातील फरार आरोपींना आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे." 


जलील आणि पोलिसांत झटापट...


आदर्श पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. तर इम्तियाज जलील यांना देखील पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि जलील यांच्यात देखील झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मोर्चेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केल्याचं समजतं.


हेही वाचा


औरंगाबाद नव्हे आता छत्रपती संभाजीनगर, नामकरण फलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण