छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मजूर कामगार सहकारी संस्था निवडणुकीत मजूर सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. शनिवार (20 जानेवारी) रोजी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या मजूर सहकार विकास पॅनलचे 15 पैकी 13 उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचा अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांनी आपली राजकीय ताकद दाखवत विरोधकांचा पराभव केला. 


जल्लोष आणि फटाक्यांची आतषबाजी


निवडणूक निकालाची घोषणा होताच सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना पेढा भरवून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. ढोलताशे आणि घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. 


विजयी उमेदवार


या निवडणुकीत मजूर सहकार विकास पॅनलचे अब्दुल गफ्फार अब्दुल नबी, उबाळे महेश भाऊराव, घुगे अप्पाराव नामदेवराव, जाधव रामहरी कारभारी, डोणगावकर रमेश राजाराम, पवार सुनील बाळासाहेब, वाळुंजे अशोक पंडितराव, सिद्दिकी मो. रज्जाक , खान मुदसीर बानो मूनवर खान, बनकर भारती दिलीप, वानखेडे दादाराव किसनराव , उगले सविता उद्धव आणि रिठे जगन्नाथ कचरूजी हे 13 उमेदवार विजयी झाले. सदरील नवनिर्वाचित संचालकांचा ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. 


भुमरे, सत्तारांनी केला प्रचार...


छत्रपती संभाजीनगर मजूर कामगार सहकारी संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. खुद्द पालकमंत्री संदिपान भुमरे आणि मंत्री सत्तार यांनी प्रचार सभेला हजेरी लावेली होती. तर, दोन्ही जुने नेते असून, त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पकड आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय नेटवर्कचा मोठा फायदा मजूर सहकार विकास पॅनलला झाला. ज्यामुळे या पॅनलचे 15 पैकी 13 उमेदवार विजयी झाले.


भुमरेंवरील आरोपामुळे निवडणूक चर्चेत आली...


छत्रपती संभाजीनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान मजूर सहकारी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली होती. यावेळी सोसायटीच्या चेअरमनने संदिपान भुमरे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे ही निवडणूक चर्चेत आली होती. ज्यात, 'विकास कामं फक्त मोठमोठ्या लोकांना मिळते. आमच्या सारख्या गरिबांना काहीच मिळत नाही. आमच्या हातात एकही काम आले नाही. आम्ही सर्व चेअरमन फक्त नालावाच चेअरमन आहोत. आमची परिस्थिती खूप गंभीर आहे. आमच्या तालुक्याचे आमदार तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे गेलो तर त्यांना 15 टक्के द्यावे लागते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे,' असं वक्तव्य चेअरमनने केले होते.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


संदिपान भुमरेंना 15 टक्के द्यावे लागते, सोसायटीच्या चेअरमनने अब्दुल सत्तारांसमोरच केली 'पोलखोल'