Chhagan Bhujbal Oath Ceremony: "ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल", ज्याचा शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं. असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले मंत्रिपदाची माळ आज भुजबळ यांच्या गळ्यात पडणार आहे. त्यामुळे मुंडे यांच्याकडे असलेलं अन्न व नागरी पुरवठा खाते आता भुजबळ यांच्याकडे सुपुर्द केले जाणार आहे. दरम्यान या मंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांना बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमावर ही भाष्य केलंय.
'राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे मी आभार मानतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांचेही मी आभार मानतो. यासह येवला-लासलगाव या माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेचे, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे, समता परिषदेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे देखील आभार मानतो. आजवर माझ्यावर ज्यांनी ज्यांनी प्रेम दाखवलं त्या सर्वांचे देखील मी आभार मानतो' अशी पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
आठ दिवसांपूर्वीच निर्णय झाला- छगन भुजबळ
दरम्यान, पुढे बोलताना, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, मंत्री पदाबाबत आठ दिवसांपूर्वीच निर्णय झाला होता. मीटिंगमध्येच ही गोष्ट ठरली होती आणि सोमवार ऐवजी मंगळवारी शपथविधी होईल, असं ठरलं. कारण मंगळवारी मंत्रीमंडळातील नेते आणि इतर लोक असतात, म्हणुन हा दिवस निवडला असल्याचेही छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या अभिनंदनाचे शहरात लागले होर्डिंग्ज
'जहा नही चैना वहा नही रहना' असे बोलत भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. यावेळी अजित पवार आणि भुजबळ यांच्यातील दुरावा देखील वाढल्याची चर्चा होती. अशातच आता भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक शहारात छगन भुजबळ यांच्या अभिनंदनाचे अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लागले आहे. छगन भुजबळ याची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने कार्यकर्ते, समर्थकांमध्ये आंनदाचे वातावरण.
हे ही वाचा