गांधी जयंतीनिमित्त प्रशासनाकडून 'चावडी वाचना'चा केवळ फार्स?
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2017 10:29 PM (IST)
आगामी काळात जिथे ग्रामपंचायती निवडणुका नाहीत, अशाच ठिकाणी चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे निम्म्याहून कमी ठिकाणी हा कार्यक्रम राबवला गेला.
बीड : गांधी जयंतीचं निमित्त साधत सरकारने राज्यभर ‘चावडी वाचन’ कार्यक्रम राबवला. कर्जमाफीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासोबतच, कुणाकडे किती कर्ज आहे, ही माहितीही शेतकऱ्यांना चावडी वाचनादरम्यान देण्यात आली. मात्र चावडी वाचनाचा हा नुसता फार्स होता का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी काळात जिथे ग्रामपंचायती निवडणुका नाहीत, अशाच ठिकाणी चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे निम्म्याहून कमी ठिकाणी हा कार्यक्रम राबवला गेला. ग्रामसभेमध्ये कुणाकडे किती कर्ज आहे, याची यादी वाचणे, पात्र शेतकऱ्यांची माहिती, शेतकऱ्यांचे शेरे नमूद करणे इत्यादी गोष्टी चावडी वाचनाच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित होत्या. मात्र गावा-गावात झालेल्या या कार्यक्रमात एक सरकारी सोपस्कर पार पाडण्यात आल्याचंच दिसून आले. बीडमधील चावडी वाचनाचा कार्यक्रम त्यात ग्रामसभेतच चावडी वाचनादरम्यान कुठल्या शेतकऱ्यावर किती कर्ज आहे, हे जाहीरपणे सांगितल्याने शेतकऱ्यांची अब्रू वेशीवर टांगली जातेय, असेही आरोप गेल्या काही दिवसात झाले. शिवाय, ही खंतही शेतकऱ्यांच्या मनात होती. त्यामुळे एकंदरीतच चावडी वाचनाच्या कार्यक्रमाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचवेली, एकीकडे सर्व डिजिटल बनवलं जात आहे. किंबहुना, कर्जमाफीच्या अर्जापासून याद्यांपर्यंत सर्वकाही ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले असूनही, चावडी वाचन घेणे म्हणजे केवळ फार्स आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.