Tiger Attack: चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ब्रम्हपुरी (Brahmapuri) वनविभागातील अतिथीगृहाजवळ वाघाने (Tiger) वनरक्षकावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांत इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओबाबत वनविभागाने अधिकृत स्पष्टीकरण जारी करत स्पष्ट केले आहे की, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला आहे.
Tiger Attack: वनविभागाचे अधिकृत निवेदन
वन विभागाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “31 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6.42 वाजता ब्रम्हपुरी वनविश्रामगृह येथे वाघाने मनुष्यावर हल्ला केल्याचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, तो पूर्णपणे बनावट आहे. चंद्रपूर वनवृत्तातील कोणत्याही भागात अशी घटना घडलेली नाही, याची खात्री वनविभाग देत आहे.” या बनावट व्हिडिओचा उद्देश जनतेमध्ये भीती निर्माण करणे व अफवा पसरवणे असल्याचे वनविभागाने म्हटले आहे.
Tiger Attack: समाजकंटकांविरुद्ध कारवाई
तसेच, हा व्हिडिओ ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या ऑनलाइन फुटेजचे मिश्रण करून तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. वनविभागाने स्पष्ट केले आहे की, “अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या आणि भीती निर्माण करणाऱ्या व्हिडिओंचा प्रसार करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.”
Tiger Attack: वनविभागाचे नागरिकांना आवाहन
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करू नयेत किंवा फॉरवर्ड करू नयेत. कोणतीही माहिती मिळाल्यास तिची अधिकृत पुष्टी झाल्याशिवाय विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरवणारे व्यक्ती अथवा पेजेस आढळल्यास तात्काळ वनविभाग किंवा पोलिसांना कळवावे.
Tiger Attack: याआधीही एआयद्वारे तयार केलेला व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. वनविभाग सतत संघर्ष कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र अशा बनावट व्हिडिओंमुळे जनतेमध्ये अनावश्यक भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याने विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरातील एआय वापरून तयार केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक व्यक्ती वाघासोबत गैरवर्तन करताना दाखवली होती. त्या प्रकरणातही व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा