मुंबई : राजकारणात एकाची नाराजी दूर करायची म्हटलं की दुसरा नाराज होतो. मात्र, पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपनं, मुनगंटीवारांची नाराजी दूर करताना आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे थोडसं वेगळेपण दाखवलं. मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आमदार किशोर जोरगेवार नाराज होत असल्याचं भाजपच्या लक्षात आलं. मग भाजपनं असा काही तोडगा काढला की मुनगंटीवार भी खूश आणि जोरगेवार भी खूश. त्यावरून चंद्रपूरचं राजकारण दिवसभर चर्चेत राहिल्याचं दिसून आलं.
भाजपचे आमदार किशोर जोरगेवार हे बुधवारी रात्रीपर्यंत चंद्रपूरचे निवडणूक प्रमुख होते. गुरुवारी सकाळी त्यांच्याकडून हे पद पक्षानं काढून घेतलं. गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा ते निवडणूक प्रमुख झाले. या सगळ्या झालेल्या आणि रद्द झालेल्या बदलांमागे होती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांची नाराजी.
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निकालांनंतर पुढचे तीन दिवस मुनगंटीवारांची नाराजी उफाळत होती. आपली शक्ती पक्षाने कशी कमी केली हे मुनगंटीवारांनी जाहीरपणे सांगितलं. त्यानंतर अचानक बुधवारपासून नाराजीची ही लाट ओसरली आणि मुनगंटीवारांनी पक्षाच्या कार्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली.
पण पक्षानं मुनगंटीवारांच्या नाराजीची दखल घेतल्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी चंद्रपूरमध्ये दिसले. किशोर जोरगेवारांचं पद राज्यसभा खासदार अजय संचेतींकडं देण्यात आलं. हा बदल जोरगेवारांसाठी धक्कादायक होताच. मात्र त्याहून धक्कादायक होतं ते म्हणजे ही बातमी पक्षातून न समजता थेट माध्यमातून समजणं.
यावर प्रतिक्रिया देताना किशोर जोरगेवार म्हणाले की, "मी नाराज असण्याचे काही कारणच नाही. देवेंद्रजींचं प्रेम आणि सहकार्य मला वारंवार मिळत आहे. पण माध्यमांकडून ज्या बातम्या येत आहेत त्यापेक्षा मला जर अगोदर कळलं तर जास्त चांगलं आहे. वादाचा परिणाम होऊ नये असं जर पक्षाला वाटत असेल तर ते योग्य नाही, तुला न मला घाल कुत्र्याला हा जो विषय असतो, तो काही योग्य नाही. हा जर निर्णय झाला असेल तर पक्षाची त्यामागे काहीतरी भूमिका असेल आणि ती भूमिका मी जाणून घेतो."
निवडणूक प्रमुख म्हणून अजय संचेतींचं नाव आल्यानंतर जोरगेवारांना आठवला तो स्थानिक असण्याचा निकष. किशोर जोरगेवार पुढे म्हणाले की, "निवडणूक प्रमुख हा स्थानिक असला पाहिजे हे खरं आहे. कारण त्याला सर्व स्थानिक गोष्टींची माहिती असते. मी दोन वेळा आमदार राहिलो आहे., भाजपचा जिल्ह्याचा महामंत्री राहिलो आहे. त्यामुळे बाहेरचा निवडणूक प्रमुख नसावा हे साधारण कुणाचंही मत असेल. पण हा सर्व निर्णय सामूहिकच असतो. कोण निवडणूक प्रमुख आहे, कोण प्रभारी आहे याने काही फरक पडत नाही. फक्त बाहेर काय मेसेज जातो एवढाच विषय आहे. संचेती यांची या निवडणुकीत मदतच होणार आहे म्हणून कदाचित त्यांची नेमणूक झाली असावी."
त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी पक्षाच्या या निर्णयाला वेगळाच अँगल दिला. जोरगेवारांकडून जी जबाबदारी काढली, ती वास्तविक त्यांच्याकडे नव्हतीच, असं मुनगंटीवारांनी सांगितल्यामुळं गोंधळात अधिकच भर पडली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "अगोदर ज्यांना चंद्रपुरात ज्यांना प्रमुख म्हटले होते, त्यांना फक्त घुग्गुस नगर परिषदेचे अनुषंगाने प्रभारी बनवण्यात आले होते. माझ्यापर्यंत ते प्रभारी आहेत अशी माहिती नव्हती."
मतदारसंघातील आपल्या शक्तीबाबत वारंवार बोलणाऱ्या मुनगंटीवारांनी मग शक्तीचा खरा अर्थही त्यांच्या खास शैलीत समजावून सांगितला. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, "मी जी शक्ती म्हणालो त्याचा तुम्ही विपर्यास केला. शक्ती याचा अर्थ म्हणजे जे जे वाईट आहे ते दूर केले पाहिजे. हे मी आज नाही तर प्रदेशाध्यक्ष असतानाच्या काळापासून बोलत आहे. मी नाराज कधीच नव्हतो. हा पक्ष माझा आहे. हे घर मोठं करण्यासाठी आम्ही रक्त आटवलं आहे, मग मी नाराज कसं होईन? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी हे घर आमचं आहे असे बोलू नये."
चंद्रपूरमध्ये सुरु असणाऱ्या या घडामोडींची संधी साधत काँग्रेसनंही भाजपवर आणि फडणवीसांवर टीका करण्याची संधी साधली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, "सुधीर मुनगटीवार अवस्था वाईट झाली. सुधीरभाऊंच्या आमदारकीचे वय झाले तीस. त्यांना विचारात नाही देवेंद्र भाऊ फडणवीस. ही सुरुवात झाली होती, हे सगळीकडे होत आहे. पक्ष वाढवायचा आहे. चोर चालेल, बलात्कारी चालेल, खुनी चालेल, सगळे चालतील. सत्ता प्राप्तीसाठी झपाटलेला पक्ष म्हणजे भाजप."
अशा प्रकारे दुपारपर्यंत जोरगेवारांनी नाराजी व्यक्त करून घेतली. मुनगंटीवारांनी उरलीसुरली नाराजी दूर करून घेतली आणि विरोधकांनी मनसोक्त टीका करून घेतली. त्यानंतर प्रसिद्ध झालं नवं नियुक्तीपत्र. या पत्रातून जोरगेवारांना पुन्हा एकदा चंद्रपूरच्या निवडणूक प्रमुखपदावर विराजमान करण्यात आलं. तर बुलढाण्याचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेतींकडे निवडणूक निरीक्षकपद देण्यात आलं.
उरता उरला मुनगंटीवारांचा प्रश्न. तर चंद्रपूर महानगरपालिका निवडणुका सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनाखाली होतील, अशीही ओळ या पत्रात छापून आली.
तर मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं, याची उत्तरं आता स्पष्ट झाली. जोरगेवारांच्या जबाबदारीत काहीच बदल झाला नाही. चैनसुख संचेतींना नवी जबाबदारी मिळाली आणि मुनगंटीवार मात्र मार्गदर्शक झाले. आता या नव्या जबाबदारीत मुनगंटीवार पक्षाला नेमका कुठला मार्ग दाखवतात, हे येत्या 16 तारखेलाच स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा: