चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह अन्य व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या मोठी आहे. मात्र, मागील काही दिवसात याच वाघांचा मृत्यूचे प्रमाण लक्षवेधी ठरतं आहे. मागील १५ दिवसांचा जर विचार केला तर विदर्भात ६ वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत दोन वाघ जखमी झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला.


दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला. तर भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली. तर एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला. तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला. तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पट्टेदार मृतदेह आढळला होता. त्यानंतर आता गोंदिया जिल्ह्यात देखील एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला असून वन विभागाकडून या वाघाचा मृत्यू नैसर्गीक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र विदर्भात मागील पंधरा दिवसांमध्ये ५ वाघांचा मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती वाघांचा आणि कोणत्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे, जाणून घेऊया सविस्तर


भंडारा : २ वाघांचा मृत्यू


भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रात २९ डिसेंबरला वाहनाच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. तर, ११ हजार केव्ही विद्युत तारांवर आकोडा टाकून वाघिणीची शिकार केल्याचा प्रकार तुमसर वनपरिक्षेत्रातील झंजेरिया जंगलात ६ जानेवारीला उघडकीस आली होती.


 नागपूर : १ वाघाचा मृत्यू


नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात ८ जानेवारी २०२५ ला वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती.


चंद्रपूर : १ वाघाचा मृत्यू


सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावाजवळील जंगलात वृद्धापकाळानं वाघाचा मृत्यू झाल्याची घटना २ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी शेतशिवारातील नाल्याजवळ घडली होती. 


यवतमाळ : १ वाघाचा मृत्यू


यवतमाळच्या वणी परिसरातील उकनी कोळसा खाणीच्या परिसरात तीन ते चार वर्षाचा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघाचा मृत्यू विजेच्या जिवंत तारेच्या स्पर्शानं झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला आहे.


गोंदिया : १ वाघाचा मृत्यू


गोंदिया जिल्ह्यातील भानपुर गावाजवळ पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला. या वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.