Balu Dhanorkar Funeral : चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) अनंतात विलीन झाले आहेत. वरोऱ्यात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. मोक्षधाम या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात बाळू धानोरकर यांना निरोप देण्यात आला. दोन्ही मुलांनी मिळून वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह मोठा जनसमुदाय इथे आला होता. 


महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशिष जयस्वाल, अमोल काळे, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, किशोर जोरगेवार यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीने मुकुल वासनिक यांनी पुष्पचक्र अर्पण केले. काँग्रेस नेते सोनिया गांधी यांच्या वतीने बाळासाहेब थोरात यांनी चक्र अर्पण केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केले.


तीन दिवसात पिता-पुत्राचं निधन


चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं काल (30 मे) निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान धानोरकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 27 मे रोजी बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच काल बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं. अवघ्या तीन दिवसात पिता पुत्राच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.


महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार


लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते. 


संबंधित बातमी


Balu Dhanorkar : ज्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार, त्याच दिवशी रुग्णालयात, बाप-लेकाचा तीन दिवसात मृत्यू; धानोरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला!