Chandrapur News:  चंद्रपूरमधील (Chandrapur) काँग्रेस (Congress) नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Chandrapur District Central Co-Operative Bank) अध्यक्ष संतोष रावत (Santosh Rawat) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी या गोळीबाराप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दोन्ही हल्लेखोर हे काँग्रेसशी संबंधित आहेत. जिल्हा काँग्रेसचा उत्तर भारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष राजवीर यादव आणि त्याचा भाऊ अमर यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष रावत यांना वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये काही लोकांना नौकरी लावून देण्यासाठी आरोपी राजवीर यादवने सहा लाख रुपये दिले होते आणि हे पैसे परत न केल्याने हा हल्ला केल्याचं आरोपीने सांगितले आहे. 


चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा सुरू होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार कोणी केला, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.  या प्रश्नाचं अखेर 12 दिवसांनी पोलिसांना उत्तर सापडलं आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस उत्तर भारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष राजवीर यादव आणि त्याचा भाऊ अमर यादव या दोघांना पोलिसांनी गोळीबार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.


11 मे रोजी मुल शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखे समोर रात्री सव्वानऊ वाजताच्या दरम्यान संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने रावत या हल्ल्यात थोडक्यात बचावले. मात्र या हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं. पोलिसांवर आरोपींना गजाआड करण्याचे प्रचंड दबाव होता. मात्र हल्ल्याचं CCTV फुटेज अस्पष्ट असल्याने पोलिसांना तपासात काहीच यश मिळत नव्हतं. मात्र, पोलिसांनी विविध अंगाने या प्रकरणाचा तपास केला. चौकशी अंती काही धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी राजवीर यादव आणि अमर यादव याला अटक केली आहे.


संतोष रावत यांच्यावर झालेला हल्ला राजकीय कारणामुळे झाल्याची जोरदार चर्चा असल्याने काँग्रेस मधील अंतर्गत राजकारण शिगेला पोहचलंय. त्यातच आता आरोपींची पार्श्वभूमी राजकीय असल्याने या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची आणि हल्ल्या मागे असलेल्या खऱ्या सूत्रधाराला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. 


पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असली तरी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बंदूक आणि गाडी अजून ताब्यात आलेली नाही. सोबतच वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड आणि संतोष रावत यांचा काय संबंध, फक्त आरोपीच्या जबाबावर या गोळीबाराच्या प्रकरणाचा गुंता सुटणार का? अशी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.