चंद्रपूर : चंद्रपूर शहरात (Chandrapur News) आजपासून सुरू होणाऱ्या जाणता राजा (Janata Raja) महानाट्याच्या स्वागतद्वार उभारणीवरून भाजप आणि अपक्ष आमदार किशोर जोरगेवार समर्थकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे चित्र बघायला मिळाले. सुमारे तासभर चाललेल्या वादानंतर अखेर भाजपला (BJP) स्वागत द्वार उभारण्यात यश आले. मात्र काहीवेळ चलेलल्या या शाब्दिक चकमकीमुळे परिसरात बराचवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जाणता राजा महानाट्याच्या आधीच राजकीय पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेल्या राजकीय महानाट्यामुळे हा विषय शहरात चांगलाच चर्चेत आला आहे.  


सुधीर मुनगंटीवारआणि जोरगेवार समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक


राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सर्वत्र जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आयोजिले आहे. अशातच सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला चंद्रपूर येथील स्थानिक चांदा क्लब क्रिडांगण येथे जाणता राजा या महानाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात सर्वत्र या महानाट्याचे आयोजन केले आहे. मात्र सर्वत्र या महानाट्याचे प्रयोग शांततेत होत असतांना चंद्रपूर शहरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांमध्ये राजकीय महानाट्य बघायला मिळाले.


स्वागत गेट लावण्यावरून आमच्याशी वाद


या कार्यक्रमासाठी आम्ही परमिशन घेऊन हे स्वागत गेट लावत होतो. मात्र भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी आम्ही स्वागत गेट उभारू याबाबत आमच्याशी वाद-विवाद केला. आमच्याकडे परमिशन असल्याने आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बळजबरी केली. दरम्यान आमच्या मध्ये काही वेळ वाद-विवाद झाला, मात्र त्यानंतर आम्ही समजदारीची भूमिका घेत हा वाद तिथेच मिटवला असल्याचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार समर्थकांचे म्हणाले. 


जाणता राजा सारखं अतिशय दर्जेदार नाटक आजपासून चंद्रपूर शहरात सुरू होत आहे. दरम्यान नागरिकांच्या स्वागतासाठी शहरात स्वागत गेट लावण्यात येत होते. असे असतांना काही लोक केवळ प्रसिद्धीसाठी स्वागत गेट लावण्यावरून आमच्याशी वाद घालत होते. आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरात चांगले कार्यक्रम सुरू असतांना अशा पद्धतीचे वाद घालणं हे राजकीय पदाधिकाऱ्यांना अशोभनीय आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्रातलं एक मोठा नाव आहे आणि चांगले कार्यक्रम कसे खराब करता येईल, कसे वादग्रस्त करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधीकडून होत आहे. मात्र असे प्रयत्न आम्ही भाजप कार्यकर्ते कदापी यशस्वी होऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार समर्थकांनी दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या