चंद्रपूर : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे (Congress) राहणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी केलेल्या एका ट्विटने चंद्रपूरच्या जागेवरून ट्विस्ट वाढला आहे. चंद्रपूरमधून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) इच्छुक असून, दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांनी देखील तयारी केली आहे. अशात, “उमेदवारी आपली, विजयही आपलाच” असा दावा करणारं ट्वीट प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. त्यामुळे शिवानी वडेट्टीवारांचा पत्ता कट झाला का? अशी चर्चा आहे. 


काय म्हटले ट्वीटमध्ये? 


माननीय दिवंगत खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्यावर अपार प्रेम करणारे आपण सर्व मित्रहो.. आदरणीय बाळूभाऊंच्या पश्चात आपण सर्वांनी अतिशय धीराने आणि धैर्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विचारांची आणि विधायक कार्याची पताका धरून ठेवली आहे.


आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्याच धीराने आणि धैर्याने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. काळ फिरत राहतो, थांबणे हा त्याचा धर्म नाही! पण तरीही मागील लोकसभा निवडणुकीत अगदी निवडणुका तोंडावर असताना आदरणीय बाळूभाऊ यांना पक्षाने उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर आपण सर्व कार्यकर्त्यांनी गाजवलेले रणमैदान निकालाच्या रुपाने सगळ्या जगाने पाहिले होते.


आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदलली नाहीये. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपणा सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे!






शिवानी वडेट्टीवारांच्या उमेदवारीचं काय? 


शिवानी वडेट्टीवारांकडून देखील लोकसभा निवडणुकीत चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागण्यात आली आहे. अशात प्रतिभा धानोरकर यांनी ट्वीट करत, "आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपणा सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे" असे म्हटले आहे. त्यामुळे शिवानी वडेट्टीवारांच्या उमेदवारीचं काय? असा प्रश्न वडेट्टीवार समर्थकांना पडला आहे. 


प्रतिभा धानोरकरांनी केला होता काँग्रेसमधील नेत्यांवर गंभीर आरोप


गेल्या काही दिवसांपासून प्रतिभा धानोरकर नाराज असून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या  चर्चा सुरु होत्या. यावर बोलतांना त्यांनी काँग्रेसमधील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. काँग्रेस पक्षामधील काही लोकं सतत माझा विरोध करत असतात. याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेल्याचा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला होता. तर, प्रतिभा धानोरकर स्वतः काँग्रेसकडून वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


'माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांनी स्वतःकडेही पाहावं'; विजय वडेट्टीवारांच्या कन्येने टोचले भाजपचे कान!