चंदिगड : आयएएस अधिकाऱ्याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली भाजपा नेता सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याला अटक करण्यात आलीय. विकास बराला याच्यासोबत त्याचा मित्र आशिष यालाही अटक करण्यात आलीय.

पोलिसांनी चौकशीसाठी विकासला पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दुपारी अडीच वाजता विकास बराला पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. विकास बरालाविरोधात अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, या छेडछाडीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. या सीसीटीव्हीत विकास बराला वर्णिकाचा पाठलाग करताना स्पष्ट दिसतंय.

दुसरीकडे चंदिगडची घटना केवळ छेडछाड नाही, तर अपहरणाचा प्रयत्न असल्याचं सांगत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी, राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केली होती.

“चंदिगडमध्ये तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न आणि छेडछाडीच्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. भाजप सरकारने गुन्हेगार आणि त्यांच्या गलिच्छ मानसिकतेचा साथ देऊ नये, त्यांना शिक्षा द्यायला हवी, असं ट्वीट राहुल गांधींनी या ट्विटमध्ये म्हणलं होतं.

शिवाय, या प्रकरणावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यभर ठिकठिकाणी भाजपचा निषेध सुरु केला होता. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.

संबंधित बातम्या

चंदीगड छेडछाड : पाच ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज गायब