नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे शहरात राबविण्यात आलेल्या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेने 90.06 टक्के लक्ष्य गाठले आहे. मनपाच्या पाच झोनमधील 33 नागरिकांमध्ये हिवतापाचे जंतू आढळल्यानंतर शासनाने ही मोहिम राबविण्याचे निर्देश दिले. जास्तीत जास्त नागरिकांना प्रतिबंधक गोळ्या देउन जनजागृती करण्यात आली. यामध्ये 11,90,884 नागरिकांनी हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे सेवन केले.  मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहाय्यक संचालक (आरोग्य सेवा) डॉ. निमगडे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलाणी यांच्या नेतृत्वात विभागाचे निरीक्षक आणि कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने ही मोहिम पूर्ण झाली.

पाच झोनमध्ये आढळले होते 33 हत्तीरोगाचे रुग्ण

नागपूर शहरातील लक्ष्मीनगर (8), धरमपेठ (2), हनुमाननगर (5), धंतोली (3) आणि नेहरूनगर (15) या पाच झोनमध्ये 33 हत्तीरोगाचे रुग्ण आढळले होते. यानंतर या 5 झोनमध्ये निवडलेल्या लोकसंख्येला हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या खाऊ घालण्याची मोहिम हाती घेण्यात आली व त्याला गती देण्यात आली. शासनाने आय.डी.ए. हत्तीरोगाच्या गोळ्या वयानुसार व उंचीनुसार जनतेला खाऊ घालण्याची मोहिम 25 मे 2022 ते 5 जून 2022 या कालावधीत राबविण्यास सुरूवात केली. उन्हाळा आणि इतर कारणांमुळे या मोहिमेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या दिल्या जाव्यात यासासठी मोहिम 22 जून 2022 पर्यंत वाढविण्यात आली.
 
शासनाने दिलेले उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याकरिता हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. ध्वनीप्रक्षेपकावरून तसेच विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे हत्तीरोगामुळे शरीरावर येणा-या विद्रुपतेची माहिती देण्यात आली व नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या खाण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचे परिणाम नागरिकांनी मोहिमेला उत्तम प्रतिसाद दर्शविले. जनतेच्या प्रतिसादामुळे मोहिमेला 90.06 टक्के लक्ष्य गाठता आल्याचे हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांनी सांगितले.

पाच झोनमधील मोहिमेसाठी निवडलेली लोकसंख्या व परिणाम 

झोनचे नाव निवडलेली लोकसंख्या गोळया खाऊ घातलेली लोकसंख्या टक्केवारी
लक्ष्मीनगर झोन 284001 231667 81.57
धरमपेठ झोन 246090 238673 96.98
हनुमाननगर झोन 288071 254654 88.39
धंतोली झोन 211039 214255 92.73
नेहरुनगर 273092 251635 92.14
एकूण 1322293 1190884 90.06