Ravikant Tupkar : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Saghtana) राहूनच काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मांडली. मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरु आहेत. त्या अफवा थांबवाव्यात असेही तुपकर यावेळी म्हणाले. रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यात (Buldhana) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.
महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार
मला शेतकरी संघटनेच राहूनच काम करायचे आहे. शेतकरी हा माझा आत्मा असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचंय. यासाठी मी आजपासून कामाला लागलो असल्याची तुपकर म्हणाले. गेल्या चार ते पाच वर्षात अनेकवेळा राजू शेट्टी यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली असल्याचे तुपकर म्हणाले. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. संघटनेत राहूनच चळवळीचं काम करत राहणार आहे. ते मला नेतृत्वानं प्रामाणिकपणानं करु द्यावं अशी माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले. शेतकरी प्रश्नांवर लढण्यासाठी महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले.
शेतकरी संघटना वाढवण्यात लाखो कार्यकर्त्यांचे योगदान
स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यात लाखो कार्यकर्त्यांचे योगदान आहे. या सर्वच कार्यकर्त्यांची ही संघटना आहे. आजच्या पुण्यातील बैठकीत त्यांची नेमकी भूमिका काय ठरते ते पाहुयात असेही तुपकर यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये हीच माझी इच्छा आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे भले झाले पाहिजे हीच माझी भूमिका आहे. विशीष्ट प्रदेशातील शेतकऱ्यांचे हित न होता महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांचे हित झाले पाहिजे. चळवळ नेटाने वाढली पाहिजे हीच माझी भूमिका असल्याचे तुपकर म्हणाले. मला मंत्री करा किंवा काहीतरी करा हेच माझं म्हणण असल्याचे तुपकर म्हणाले.
रविकांत तुपकर हे गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या कार्यपाध्दतीवर नाराज आहेत. त्यांनी गेल्या काही काळात राजू शेट्टी यांच्यावर उघडपणे टीका देखील केलीय. त्यामुळं आता रविकांत तुपकर यांच्या मनात चाललंय तरी काय...? असा सवाल उपस्थित होतोय. मिळालेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर हे इतर कुठल्याही पक्षात प्रवेश न करता स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करण्याची दाट शक्यता सुत्रांनी वर्तवली होती. त्यानंतर परवापासून नॉट रिचेबल असलेल्या रविकांत तुपकरांनी आज अखेर आपली भूमिका मांडली.
महत्त्वाच्या बातम्या: