बुलढाणा : निवडणुकीआधी मतदारांना राजा म्हणून त्यांच्या पाया पडणारे, घराघरांचे उंबरठे झिजवणाऱ्या नेत्यांनी निवडणूक झाल्यानंतर त्यांचे खरे रुप दाखवायला सुरूवात केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तशाच प्रकारची प्रचीती बुलढाणातील मतदारांना आता आली आहे. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना जाहीर शिवीगाळ केली आहे. फक्त मटण, दारू आणि दोन हजारात विकले गेले असं म्हणताना त्यांनी शिवीही हासडली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर यांच्यापेक्षा रांX बऱ्या असंही त्यांनी म्हटलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वाद आणि शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांचा जवळचा संबंध आहे. बुलढाण्यातील जयपूर गावातील एका कार्यक्रमात मतदारांकडून सत्कार स्वीकारताना आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांनाच शिव्यांची लाखोली वाहिली.
Sanjay Gaikwad Viral VIDEO : नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?
तुम्ही फक्त एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण आणि पैसे. अरे दोन-दोन हजारात विकले गेले भाडXX साले. यांच्यापेक्षा तर रांX बऱ्या. एकीकडे हा आमदार मतदारसंघाचा विकास करायला निघालाय. लेकी-बाळांचे कल्याण करायला निघालाय. दुसरीकडे हे लोक म्हणतात की संजय गायकवाडला पाडा.
समजा मी पडलो असतो तर झाले असते का प्रोजेक्ट पूर्ण? माझं चॅलेंज आहे एक खडाही नसता पडला. आज एकट्या जयपूर गावासाठी मी 24 कोटीची कामं केली. विकासकामांसाठी आणलेली आकडेवारी पाहिली तर तुमचे डोळे फिरतील.
आमदार संजय गायकवाडांनी यावेळी कोणत्या गावाला किती निधी आणला याची यादीच वाचून दाखवली. पण हे करत असताना मात्र त्यांनी आपल्या भाषेची पातळी मात्र घसरवली. खासगीत नव्हे तर जाहीर भाषणात त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली.
निवडणूक आली की हेच नेते मतदारांना राजा म्हणतात आणि त्यांच्या पाया पडतात. घरा-घरात जाऊन मतं मागतात. त्यावेळी त्यांची विनम्रता पाहून मतदारही भारावून जातात. साहेब माझ्याशी बोलले, खांद्यावर हात ठेऊन खुशाली विचारली असा विचार करून मतदारही हवेत जातात आणि मतदान करतात. निवडणुकीनंतर मात्र त्यांना वेगळाच अनुभव येतो. आमदार संजय गायकवाड यांच्यासारखे नेते मतदारांना जाहीर शिवीगाळही करायला मागेपुढे पाहत नाहीत हे बुलढाण्यातील त्यांच्या भाषणावरून दिसून येतंय.
Sanjay Gaikwad Vulgar Speech : यांच्यापेक्षा त्या रांXX बऱ्या, गायकवाडांची मतदारांना शिवीगाळ