बुलढाणा : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या बडबडीमुळे आणि वर्तनामुळे वादात अडकले आहेत. खराब झालेले जेवण खायला देतो का असं म्हणत त्यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. अगदी बनियन आणि टॉवेलवर येऊन त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यानंतरही गायकवाड आपल्या मतावर ठाम राहिले आणि पुन्हा असं झालं तरी हेच करणार असंही सांगितलं. संजय गायकवाड यांच्याबाबत असं काही पहिल्यांदाच घडलं नाही.

नेमकं काय घडलं?

आमदार गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवणं मागवलं. वरण आणि भाताचा पहिला घास खाल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं. त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात 'मला विष खायला घालतो का' असं विचारल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि तुफान मारहाण केली.

संजय गायकवाड हे त्यांच्या कृतीने वा वक्तव्याने पहिल्यांदाच चर्चेत आले नाहीत. या आधीही त्यांनी अशा प्रकारची अनेक वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला होता.

फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबणार - 19 एप्रिल 2021

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना संजय गायकवाडांनी त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकारण करत असल्याची टीका केली होती. त्यावरून त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यही केलं होतं. ते म्हणाले होते की, "सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. पण विरोधी पक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहेत. मला जर कोरोनाचा विषाणू मिळाला तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन."

शिवजयंती मिरवणुकीतील मारहाण - मार्च 2024

गेल्या वर्षी शिवजयंतीच्या मिरवणुकीत संजय गायकवाड यांनी एका तरुणाला काठीने मारहाण केली होती. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी 11 लाख रुपये बक्षीस - सप्टेंबर 2024

राहुल गांधी यांच्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले होते की, राहुल गांधींची जो जिभ कापेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देणार. गायकवाडांनी लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्याविरुद्ध हे वक्तव्य केलं आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

महाराष्ट्र पोलिस जगातील सर्वात अकार्यक्षम - एप्रिल 2025

महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल.

मतदारांना फक्त दारू अन् मटण पाहिजे - जानेवारी 2025

विधानसभेच्या निवडणुकीत कमी मते पडल्यानंतर एका जाहीर सभेत संजय गायकवाडांनी मतदारांना शिव्या दिल्या. मतदारांना फक्त दारू आणि मटण पाहिजे. हे दोन हजारात विकले जातात. यांच्यापेक्षा वेश्या बऱ्या असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य - 7 जुलै 2025

भाषेच्या मुद्द्यावर बोलताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते काही मुर्ख होते का असं वाचाळवीरपणा गायकवाडांनी केला. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातांबद्दलही अपशब्द वापरले.

वाघाच्या शिकारीचा दावा - फेब्रुवारी 2024

सन 1987 साली आपण वाघ मारला होता आणि त्याचा दात गळ्यात घालून फिरतोय असा दावा संजय गायकवाड यांनी केला होता.

शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ

संजय गायकवाड यांनी एका शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ केली होती. तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

एकंदरीत आमदार संजय गायकवाड हे हिंसात्मक वृत्तीचे, अतिशयोक्ती आणि बळाचा वापर करणारे असंच चित्र आहे. असं असलं तरी सत्ताधारी महायुती असो वा त्यांच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे असो, संजय गायकवाडांची प्रत्येक कृती पाठीशी घातली जाते असंच सध्याचं चित्र आहे.